धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद जाणार की राहणार? राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीचा निर्णय गुलदस्त्यात!

0
119
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप झाल्यामुळे अडचणीत आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे परळीचे आमदार आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे प्रकरणावरून राज्यातील राजकारण ढवळून निघाले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून गुरूवारी रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक झाली. मात्र या बैठकीतील निर्णय गुलदस्त्यातच असून मुंडेचे मंत्रिपद जाणार की राहणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर असून पक्ष म्हणून याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे शरद पवार यांनी दुपारीच जाहीर केले होते. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी गुरूवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास ही बैठक झाली. ती तासभर म्हणजेच रात्री साडेअकरा वाजेपर्यंत चालली.

हेही वाचाः मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या, आमदारकीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान

या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हेही उपस्थित होते. धनंजय मुंडे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर झालेली ही बैठक महत्वाची मानली जात आहे. मात्र कोअर कमिटीच्या या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली आणि कोणता निर्णय घेण्यात आला, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.

हेही वाचाः नवा ट्विस्टः धनंजय मुंडेंवर आरोप करणारी महिला हनी ट्रॅपमध्ये अडकवणारी, भाजप नेत्याची तक्रार

बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे आरोप  झाल्यामुळे धनंजय मुंडे भाजपने मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस मुंडे यांचे मंत्रिपद काढून घेणार की त्यांना आणखी वेळ देणार, हे या बैठकीनंतरही स्पष्ट होऊ शकले नाही. धनंजय मुंडे यांनी आधीच शरद पवारांची भेट घेऊन आपली बाजू मांडली आहे.

हेही वाचाः धनंजय मुंडेंची आमदारकी गेली तर….परळीत पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित

दरम्यान, मुंबईचे सहपोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनीही शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहोचून पवारांची भेट घेतली. गुरूवारी सायंकाळी झालेल्या या भेटीत पवारांनी विश्वास नांगरे यांच्याकडून मुंडेंवरील आरोपांची माहिती घेतल्याचे सांगण्यात येते. पवारांच्या भेटीनंतर नांगरे पाटील यांनी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतल्याचे समोर येत आहे.

हेही वाचाः राज्यातील १४ हजार २३२ ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरू, एकेक मतासाठी गावपुढाऱ्यांची धावपळ

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस मुंडे यांचे मंत्रिपद काढून घेणार की त्यांना अभय देणार? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तरीही मुंडे यांचे मंत्रिपद काढून घेतले जाण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत मुंडे यांना मंत्रिपदापासून दूर ठेवले जाऊ शकते, असे राजकीय जाणकारांना वाटते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा