अनिल देशमुखांबाबतचे सत्य-असत्य काय? याचा खुलासा सीबीआयनेच करावाः राष्ट्रवादीची मागणी

0
95
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपात सीबीआयला प्राथमिक तपासात कोणतेही तथ्य आढळले नाही, परंतु तपास अधिकाऱ्याची शिफारस डावलून सीबीआयने देशमुखांविरोधात एफआयआर नोंदवला, असे सूचित करणारी कागदपत्रे समोर आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचा पारा पुन्हा चढला असून अनिल देशमुखांबाबतचे नेमके सत्य असत्य काय? याचा खुलासा सीबीआयनेच करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयने प्राथमिक तपासातच क्लीनचिट दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. यावर नबाव मलिक यांनी सीबीआयला जबाबदारीची जाणीव करून दिली आहे. अनिल देशमुख यांच्या प्रकरणातील प्राथमिक चौकशी अहवालाच्या बातम्या समोर आल्या आहेत. हा अहवाल सत्य की असत्य यावर आम्ही भाष्य करत नाही. त्याचा खुलासा सीबीआयनेच करावा. हा अहवाल सीबीआयच्या फाईलमधील आहे की बनावट आहे, याचा खुलासा करण्याची जबाबदारी सीबीआयची आहे, असे मलिक यांनी म्हटले आहे.

हा विषय गंभीर आहे. एखाद्या व्यक्तीवर आरोप झाले. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. जर हे कागद सत्य आणि त्या फाईलमधील असतील तर यापेक्षा राजकीय सूडबुद्धीने केलेली कुठलीही कारवाई होऊ शकत नाही. त्यामुळे या प्रकरणाचा खुलासा सीबीआयनेच करावा, असे मलिक यांनी म्हटले आहे.

अनिल देशमुख यांची चौकशी ही जाणीवपूर्वक आणि आकस ठेवून करण्यात येत असून सीबीआयच्या उपधीक्षकांनाच देशमुख यांच्यावरील आरोपात तथ्य वाटत नसल्याचे सूचवणारी पीडीएफ स्वरुपातील कागदपत्रे समाजमाध्यमात गेल्या दोन दिवसांपासून फिरत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशानुसार प्राथमिक तपासात दखलपात्र गुन्हा असल्याचे निदर्शनास आले तरच एफआयआर दाखल करता येतो. अनिल देशमुख प्रकरणात सीबीआयचे उपअधीक्षक आणि या प्रकरणाचे तपास अधिकारी आर. एस. गुंजाल यांनी १५ दिवसांच्या सखोल चौकशीनंतर अनिल देशमुखांवरील आरोपांत काहीच तथ्य नसल्याने चौकशी बंद करण्याची शिफारस केली होती. परंतु ही बाब न्यायालयासमोर मांडण्यात आलीच नाही. तपास अधिकाऱ्याची शिफारस  डावलून एफआयआर नोंदवला गेला, असा दावा या कागदपत्रांत करण्यात आला आहे. अनिल देशमुख यांना अडचणीत आणण्यासाठीच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करण्यात आले, असा निष्कर्षही या कागदपत्राच्या आधारे काढण्यात येत आहे. याच कागदपत्रातील एक पेज ट्विट करून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी अनिल देशमुखांना प्राथमिक तपासातच सीबीआयने क्लीनचिट दिल्याचा दावा केला आहे. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांच्या या दाव्यावरून आता महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे.

अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची सीबीआयने केलेल्या प्राथमिक चौकशीच्या अहवालाची सत्यता आणि स्वतःचे निर्दोषीत्व सिद्ध करण्याची जबाबदारी सीबीआयची! सीबीआयवर असलेला  दबाव पाहता सत्य समोर येईल असे वाटत नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन चौकशी झाली पाहिजे, असेही सावंत यांनी म्हटले आहे.

 रोहित पवार म्हणालेः सत्तेसाठी असत्याचा गोंगाट- काँग्रेसच्या या दाव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. सत्तेसाठी असत्याचा कितीही गोंगाट केला तरी सत्य हे कधीच झाले जात नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. यातून सत्तेसाठी हपापलेल्या भाजपची अस्वस्थता अजून वाढणार असल्याने त्यांना मनःशांती लाभो आणि खोटारडेपणा करून राज्याला बदनाम आणि अशांत न करण्याची सुबुद्धी मिळो, अशी मी प्रार्थना करतो, अशा शब्दांत रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

परमबीर सिंहांना बेड्या ठोकाः मुश्रीफ- परमबीर सिंह हे खाकी वर्दीतील दरोडेखोर असून त्यांच्या मुसक्या बांधून गजाआड करा, अशी मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. अनिल देशमुख हे निर्दोष आहेत. भाजपने मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांना हाताशी धरून आरोप करून देशमुख आणि पक्षाला बदनाम करण्याचे कारस्थान केले आहे, हे मी सातत्याने सांगत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी पंधरा दिवसांत प्राथमिक अहवाल देण्याचा आदेश सीबीआयला दिला होता. त्यात दोषी असतील तर त्यांच्यावर एफआयआर दाखल करावा. पण गुन्ह्यातील प्राथमिक अहवालात सीबीआयने माजी गृहमंत्री देशमुख यांना क्लीनचिट दिल्याची माहिती आहे, असे मुश्रीफ म्हणाले. सीबीआयने माजी गृहमंत्री देशमुख यांना निर्दोष ठरवत दूध का दूध, पानी का पानी असे स्पष्ट केले आहे. या प्रकरणी तक्रार करणारे परमबीर सिंह हे खाकी वर्दीतील दरोडेखोर असून त्यांच्या मुसक्या बांधून त्यांना गजाआड करा, असेही मुश्रीफ म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा