राज्यपाल नियुक्त आमदारांत राष्ट्रवादीकडून हेमंत टकलेंची वर्णी, राजू शेट्टी आणि खडसेंचा पत्ता कट?

1
939
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू हेमंत टकले यांची वर्णी लावण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आलेल्या नावापैकी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा पत्ता कट करण्यात आल्यानंतर त्यांच्या ऐवजी आता हेमंत टकले यांना विधान परिषदेवर पाठवण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. या यादीतून भाजपमधून नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचेही नाव वगळले जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर विधान परिषदेवर पाठवायच्या १२ राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी राज्य सरकारच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवण्यात आली. राज्यपाल कोश्यारी यांनी याबाबत कोणताच निर्णय न घेतल्यामुळे कोर्टबाजीही झाली. या प्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवर निकाल देताना मुंबई उच्च न्यायालयाने आम्ही राज्यपालांना आदेश देऊ शकत नाही, परंतु राज्यपाल बारा विधान परिषद सदस्यांचा निर्णय अनिश्चित काळासाठी प्रलंबित ठेवू शकत नाहीत, असे सांगत राज्यपालांना घटनात्मक कर्तव्याची आठवणही करून दिली होती. त्यानंतर आता राज्यपाल या प्रकरणी निर्णय घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असतानाच सरकारकडून पाठवण्यात आलेल्या १२ नावांपैकी काही नावे वगळण्यात येणार असल्याची बातमीही समोर आली आहे. त्यात राजू शेट्टी यांचेही नाव आहे.

 महाविकास आघाडी सरकारकडून राज्यपालांकडे १२ आमदारांची सुधारित यादी पाठवली जाणार आहे. निवडणुकीमध्ये नुकत्याच पराभूत झालेल्या नेत्यांची लगेच विधान परिषदेवर वर्णी लावता येऊ शकते का? असा एक तांत्रिक मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. त्यावर आता सरकारमध्ये खल सुरू आहे. या आधी महाविकास आघाडीकडून राज्यपालांकडे पाठवण्यात आलेल्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नावाचा समावेश करण्यात आला होता. मात्र या तांत्रिक मुद्यामुळे शेट्टी आणि खडसे यांच्या नावावर राष्ट्रवादीकडून फुली मारली जाण्याची शक्यता आहे. याच तांत्रिक कारणामुळे शिवसेनेकडून नामनिर्देशित करण्यात आलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचेही नाव वगळले जाऊ शकते. राजू शेट्टी आणि मातोंडकर हे दोघे लोकसभा निवडणुकीत तर खडसे हे विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी राजू शेट्टी यांचे नाव पाठवण्यात आल्यानंतरही त्यांनी सरकारविरोधी आक्रमक पवित्रा घेत टिकास्त्र सोडले होते. शेट्टी यांनी राज्य सरकारची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यातच निवडणुकीतील नुकत्याच पराभवाचा तांत्रिक मुद्दा पुढे आल्यामुळे शेट्टींच्या नावावर फुली मारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला आयतेच कारण मिळाले आहे.

राजू शेट्टी यांच्या नावाला कात्री लावण्यानंतर त्यांच्या जागी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हेमंत टकले यांचे नाव पुढे आले आहे. हेमंत टकले हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जातात. शिवाय त्यांना विधान परिषदेतील कामाचाही मोठा अनुभव आहे. विधान परिषदेत सरकारची बाजू ठामपणे मांडणारा अनुभवी नेता हवा, असे राष्ट्रवादी काँग्रेसला वाटल्यामुळे हेमंत टकले यांच्या नावाचा यादीत समावेश केला जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. हेमंत टकले हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आहेत.

एक प्रतिक्रिया

  1. राष्ट्रवादीच्या यादीत यशपाल भींगे ह्यांचे सुद्धा नाव आहे, ते पण लोकसभा निवडणूक हारलेले उमेदवार आहे,
    त्यांचे काय…???

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा