समीर वानखेडे जन्मापासून आजपर्यंत मुस्लिमचः नवाब मलिकांचा दावा, पण वानखेडे म्हणतात…

0
647
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः एनसीबीसीचे मुंबई झोनचे अधिकारी समीर वानखेडे हे नव्या वादात सापडत चालले आहेत. समीर वानखेडे हे जन्मापासून आजपर्यंत मुस्लिमच आहेत, असा दावा करून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी खळबळ उडवून दिली आहे.  तुम्ही धर्म लपवून खोटे दाखले काढत आहात. एका मागासवर्गीयाचा अधिकार हिसकावून घेत आहात आणि सत्यमेव जयते म्हणता, अशा शब्दांत मलिकांनी वानखेडेंवर टिकास्त्र सोडले आहे.

भाजपकडून हिंदू-मुस्लिम मुद्दा काढला जात होता. वानखेडे हे समीर दाऊद वानखेडे आहेत. जन्मापासून आजपर्यंत ते मुस्लिमच आहेत. त्याचा जन्मदाखला मी प्रसिद्ध केला आहे. यासाठी मला बरेच परिश्रम घ्यावे लागते. त्यांच्या बहिणीच्या दाखल्यात के. वानखेडे शब्द वापरला आहे. हे दाऊद वानखेडे ज्यांनी धर्मांतर केल्यानंतर नाव बदलले होते त्याच्या आधारे जन्मदाखला काढण्यात आला. नंतर त्यात खाडाखोड करण्यात आली आणि त्यातून बोगसगिरी सुरू झाली आहे. मी अजून काही कागदपत्रे समोर आणणार आहे, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

समीर वानखेडे यांनी बोगस प्रमाणपत्र काढून आयआरएसची नोकरी घेतली आहे. त्यांचा काळा अध्याय जनतेसमोर आणणार आहे. हा बोगस माणूस असून त्याची बोगसगिरी सुरू आहे. हा माणूस बोगस केसेस करत असून दहशत निर्माण करत आहे. हा माणूस पैसे गोळा करत असून मुंबईतून शेकडो कोटी वसूल करण्यात आले आहेत. आज ना उद्या सगळे समोर येणार आहे, असे मलिक म्हणाले. ते एबीपी माझाशी बोलत होते.

नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा फोटो ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. त्याबाबत विचारले असता मलिक म्हणाले की, ७ डिसेंबर २००६ मध्ये लग्न झाले तेव्हा रिसेप्शन झाले. हा फोटो त्या दिवशीचा आहे. ज्यांना सोडचिठ्ठी दिली, त्या पत्नीच्या फेसबुकवर हा फोटो आहे. समीर वानखेडे यांना पहिल्या पत्नीपासून एक मुलगाही असल्याचे मलिक म्हणाले.

 या फोटोला का घाबरत आहात? सोडचिठ्ठी दिली त्यांनीच हा फोटो फेसबुकवर ठेवला आहे. तुमचा मुलगा कुठे शिकतो? त्याचे नाव काय? धर्म काय? याचेही पुरावे आहेत. तुम्ही धर्म लपवून खोटे दाखले काढत आहात. एका मागासवर्गीयाचा अधिकार हिसकावून घेत आहात आणि सत्यमेव जयते म्हणता, अशा शब्दांत नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंना जाब विचारला आहे.

समीर वानखेडे शंभर टक्के मुस्लिमचः समीर वानखेडे हे शंभर टक्के मुस्लिमच आहेत. आजदेखील आहेत आणि कालपण होते. एका मशिदीत जाऊन ते भाषण करत आहेत. एखाद्या मौलानापेक्षा जास्त धार्मिक विषय ते सांगत आहेत. नोकरीसाठी बोगस दाखला काढून त्यांनी नोकरी घेतली. बोगसगिरीतून ते निर्माण झाले आहेत. समीर वानखेडेंची जी नवीन पत्नी आहे, त्यांच्या कंपनीत कोणत्या बिल्डरची गुंतवणूक आहे. कोणत्या माध्यमातून हवाला रॅकेटने हे पैसे पाठवत आहेत, ही माहिती आज ना उद्या लोकांसमोर येईलच, असेही मलिक म्हणाले.

वानखेडे म्हणतात- माझे वडिल हिंदू, आई मुस्लिमः समीर वानखेडे यांनी नवाब मलिकांच्या आरोपांवर खुलासा देणारे एक पत्रक जारी केले आहे. महाराष्ट्र सरकारमधील माननीय अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी माझ्याशी संबंधित काही दस्तऐवज त्यांच्या ट्विटर हँडलवर प्रकाशित केले आहेत. ज्यात समीर दाऊद वानखेडे असे नाव घेत फर्जीवाडा हुआ असे सांगितले गेले आहे. याच संदर्भात मी सांगू इच्छितो की, माझे वडिल ज्ञानदेव कचरूजी वानखेडे ३० जून २००७ रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे येथील वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून निवृत्त झाले. माझे वडिल हिंदू आणि माझी आई स्वर्गीय श्रीमती झहिदा मुस्लिम होत्या. मी भारतीय परंपरेतील एक संमिश्र, बहुधर्मीय आणि धर्मनिरपेक्ष कुटुंबातील आहे आणि मला माझ्या वारश्याचा अभिमान आहे, असे वानखेडे यांनी म्हटले आहे.

मी २००६ मध्ये विशेष विवाह कायदा १९५४ अंतर्गत नागरी विवाह समारंभात डॉ. शबाना कुरेशी यांच्याशी लग्न केले. २०१६ मध्ये विशेष विवाह कायद्यांतर्गत आम्ही दोघांनी दिवाणी न्यायालयाव्दारे परस्पर घटस्फोट घेतला. २०१७ मध्ये मी क्रांती दीनानाथ रेडकर ह्यांच्याशी लग्न केले. ट्विटवर माझे वैयक्तिक दस्तऐवज प्रकाशित करणे हे निंदनीय आहे आणि माझ्या कौटुंबिक गोपनीयतेवर अनावश्यक आक्रमण आहे. मला, माझे कुटुंब, माझे वडिल आणि माझ्या दिवगंत आईला बदनाम करण्याचा हेतू आहे. गेल्या काही दिवसांपासून माननीय मंत्र्यांच्या कृत्यांच्या मालिकेने मला आणि माझ्या कुटुंबाला जबरदस्त मानसिक आणि भाव दबावाखाली ठेवले आहे, असेही वानखेडे यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा