‘समीर वानखेडे ७० हजारांचा शर्ट, लाखांची पँट वापरतात; ईमानदार अधिकाऱ्याला हे कसे परवडते?’

0
120
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आजही गंभीर आरोप केले. समीर वानखेडे यांनी एनसीबीत आल्यापासून स्वतःची प्रायव्हेट आर्मी उभी आहे. या आर्मीच्या माध्यमातून कोट्यवधींची वसुली केली जात असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. वानखेडे यांच्या लाइफ स्टाइलवरही मलिकांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहेत. समीर वानखेडे हे लाखो रुपये किंमतीचे कपडे वापरतात. एकदा वापरलेला शर्ट परत त्यांच्याकडे दिसत नाही, असेही मलिक म्हणाले. इमानदार समीर वानखेडेंना हे सगळे कसे परवडते, असा सवालही त्यांनी केला आहे.

समीर वानखेडे हे इमानदार अधिकारी असल्याचे देवेंद्र फडणवीस आणि भाजपकडून सांगितले जात आहे. पण ते वस्तुस्थितीला धरून नाही. एनसीबीच्या कोणत्याही अधिकाऱ्यांचा शर्ट हजार-पाचशे रुपयांपेक्षा महागडा नाही. पण वानखेडेंचे फोटो बघा. ते नरेंद्र मोदींच्याही पुढे निघून गेले आहेत. समीर वानखेडे हे रोज नवनवे कपडे वापरतात. त्याची किंमत ५० हजारांपेक्षा जास्त असते. ते ३० हजारांपासून सुरू होणारे टी-शर्ट वापरतात. ७० हजारांची पँट वापरतात. पाच लाखांपर्यंतची वेगवेगळी ब्रँडेड घड्याळे वापरतात. अडीत ते तीन लाख रुपये किंमतीचा बेल्ट वापरतात. एका इमानदार अधिकाऱ्याला हे कसे परवडते? असा सवाल मलिक यांनी केला.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

वानखेडे म्हणतात ही तर फक्त अफवाचः दरम्यान, समीर वानखेडे यांनी नवाब मलिकांच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या महागड्या कपड्यांचे म्हणाल तर ही फक्त अफवा आहे. नवाब मलिक यांना याविषयी फार कमी माहिती आहे. त्यांनी या विषयीची खरी माहिती शोधून काढायला हवी, असे वानखेडे म्हणाले. नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंच्या बहिणीवरही आरोप केले होते. त्यावर बोलताना वानखेडे म्हणाले की, सलमान नावाच्या ड्रग्ज पेडलरने माझ्या बहिणीची भेट घेतली होती. पण ती एनडीपीएसच्या केसेस हाताळत नसल्यामुळे तिने त्याला परत पाठवले. त्यानंतर सलमानने आम्हाला एका मध्यस्थाकरवी जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला अटक झाली. सध्या तो तुरूंगात आहे. त्याच्या व्हॉट्सअप चॅटवरून चुकीचे आरोप केले जात आहेत. सलमानसारख्या ड्रग्ज पेडलरचा वापर करून माझ्या कुटुंबाला अडकवण्याचा देखील प्रयत्न झाला. असे प्रयत्न अजूनही होत आहेत. या सगळ्यामागे ड्रग्ज माफिया आहेत, असेही वानखेडे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा