‘नवरा स्वतः भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकलाय आणि ताई विचारतात की नवीन वसुली मंत्री कोण?’

0
1296
छायाचित्रः चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर

मुंबईः राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर राजीनामा दिला. पण आता प्रश्न उरतो की नवा वसुली मंत्री कोण? असा सवाल करणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार टिकास्त्र सोडले आहे. ‘स्वतःचा नवरा भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकलेला आरोपी असून ताई विचार आहेत नवीन वसुली मंत्री कोण?,’  अशा शब्दांत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघांचा समाचार घेतला आहे.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची पंधरा दिवसात प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानंतर नैतिकतेच्या आधारावर देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. देशमुखांच्या राजीनाम्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती. ‘अखेर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर राजीनामा दिला आहे. आता प्रश्न उरतो की नवीन वसुली मंत्री कोण? चेहरा बदलल्याने महाविकास आघाडी सरकारचा भ्रष्ट हेतू बदलणार नाही,’ असे चित्रा वाघ म्हणाल्या होत्या.

चित्रा वाघ यांच्या या टिकेचा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अगदी खोचक शब्दांत समाचार घेतला आहे. ‘ ताईंचा नवरा स्वतः भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकलेला आरोपी असून त्यांच्यावर रितसर गुन्हा दाखल झालेला आहे आणि ताई विचारत आहेत नवीन वसुली मंत्री कोण? अहो ताई भावनेच्या भरात इतकेही वाहून जाऊ नका की अंगलट आले की परत पवार साहेब माझ्या वडिलांसारखे आहेत, हे म्हणायची वेळ येईल. थोडा धीरज रखो, सब सच सामने आयेगा!!’ असा टोला चाकणकर यांनी चित्रा वाघांना फेसबुक पोस्टच्या माध्यमातून लगावला आहे.

 बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने गुन्हा दाखल केल्यानंतर चित्रा वाघ यांनी फेब्रुवारीमध्ये नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांची आठवण काढली होती. एसीबीने माझ्या पतीवर गुन्हा दाखल केल्याची बातमी समजल्यापासून मला शरद पवार साहेबांची खूप आठवण येत आहे. तो बापच आहे माझा माझे बापच आहेत, असे चित्रा वाघ म्हणाल्या होत्या. हे सांगत असताना त्यांचा कंठही दाटून आला होता. आता चित्रा वाघांनी देशमुखांच्या निमित्ताने नवा वसुली मंत्री कोण? असा प्रश्न विचारल्यावर चाकणकरांनी चित्रा वाघांना नेमकी तिच आठवण करून दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा