मुंबईः भाजप नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर केलेल्या लाक्षणिक उपोषणाच्या मंचावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतःचे बूट हातात घेऊन वावरताना दिसले. त्यावर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी फडणवीसांवर हल्लाबोल चढवला असून चोरांच्या टोळीत बसलो असे फडणवीसांना वाटले की काय? असा खोचक सवालही केला आहे.
‘पंकजांच्या उपोषणात देवेंद्र फडणवीसांना बूट चोरी जाण्याचीच धास्ती, बूट हातात घेऊन दिल्या बाईट्स’ असे वृत्त न्यूजटाऊनने (https://www.newstown.in/) या छायाचित्रासह सर्वात आधी दिले आणि महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात फडणवीसांच्या या छायाचित्राचीच चर्चा सुरू झाली. अनेकांनी न्यूजटाऊनच्या या बातमीचा स्क्रीन शॉट काढून आपले व्हॉट्सअप डीपीही ठेवले. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकरणकर यांनीही न्यूजटाऊनच्या या बातमीचा स्क्रीन शॉट फेसबुकवर शेअर करत फडणवीसांनावर हल्लाबोल केला.
हेही वाचाः पंकजांच्या उपोषणात देवेंद्र फडणवीसांना बूट चोरी जाण्याचीच धास्ती, बूट हातात घेऊन दिल्या बाईट्स
‘ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसजी, आपण गेली पाच वर्षे राज्याचा विकास किती जलदगतीने केलाय, हे घसा ताणून सांगत होता. प्रत्येक भाषणात महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे, असे ढोल बडवत सांगत होता… चक्क आपण आज आंदोलनात सहभागी झालात… आपल्याच लोकांवर विश्वास नाही, चोरांच्या टोळीत बसलोय की काय असा विश्वास वाटत असेल म्हणून बूट हातात घेऊन भाषण केले. विरोधात आहात मान्य आहे, पण महाविकास आघाडी सत्तेत येऊन महिनाच झाला आहे. पाच वर्षातील तुमच्या सत्तेतील हिशेब द्या, असे चाकणकर यांनी म्हटले आहे.