ईडी ही सरकारी यंत्रणा, मग त्यांची माहिती इतर लोकांकडे येतेच कशी?- खा. सुप्रिया सुळेंचा सवाल

0
105
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः ईडी आणि सीबीआयच्या चौकशीच्या चक्रव्यूहात अडकलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयने ताब्यात घेऊन चौकशी केल्यामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले असून त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर टिकास्त्र सोडले आहे. ईडी आणि सीबीआय या सरकारी यंत्रणा आहेत. मग ईडीची माहिती इतर लोकांकडे येतेच कशी? ही माहिती लीक होतेच कशी? असा सवाल खा. सुळे यांनी केला आहे.

 राज्यात सुरू असलेल्या ईडी, सीबीआयच्या कारवायांबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना खा. सुळे म्हणाल्या की, अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी आणि त्यांच्या वकिलाला ताब्यात घेणे ही दुर्दैवी घटना आहे. घरात तीन महिला असताना अशी कारवाई होणे हे तर दुर्दैवी असेच आहे. राज्यात व्यक्तिगत दोषारोप आणि द्वेषाच्या राजकारणाला कधीच जागा नव्हती. आमच्यावर यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहेत. सीबीआय, ईडी या सरकारी यंत्रणा आहेत. मग असे असताना ईडीची माहिती इतर लोकांकडे कशी येते? ही माहिती लीक कशी होते?, असा सवाल खा. सुळे यांनी केला आहे.

 राज्यात महाविकास आघाडीचे सरकार गेल्या दोन वर्षांपासून चांगले काम करत आहे, हे जनता बघत आहे. महाविकास आघाडीला लोकांचे प्रेमही मिळत आहे. मात्र केंद्र सरकाच्या माध्यमातून सत्तेचा गैरवापर करून तपास यंत्रणांचा वापर केलेला मी कधीच पाहिलेलेन ही. मी इतकी वर्षे सामाजिक जीवनात काम करत आहे. मात्र असा गैरवापर मी कधीच पाहिलेला नाही. राज्यात हे सुडाचे राजकारण सुरू आहे. अशा प्रकारचे सुडाचे राजकारण कधीही टिकलेले नाही आणि पुढेही टिकणार नाही, अशा शब्दांत खा. सुळे यांनी भाजप आणि मोदी सरकारवर टिकास्त्र सोडले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा