नीती आयोगाच्या सीईओंवर भडकल्या सुप्रिया सुळे, म्हणाल्याः भारतातील लोकशाहीचा सार्थ अभिमान!

0
58
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः भारतात जरा जास्तच लोकशाही आहे. त्यामुळे येथे कठोर सुधारणा लागू करणे कठीण होऊन जाते, असे वक्तव्य करणारे नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निषेध केला आहे. भारतातील लोकशाही व्यवस्थेचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असेही सुळे यांनी कांत यांना सुनावले आहे.

भारतात अतिलोकशाहीमुळे कठोर सुधारणा लागू करणे कठीण आहे. देशाला स्पर्धात्मक बनवण्यासाठी आणखी कठोर सुधारणांची आवश्यकता आहे, असे वक्तव्य अमिताभ कांत यांनी स्वराज्य पत्रिकेच्या कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे संबोधित करताना मंगळवारी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा सुप्रिया सुळे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

भारतात लोकशाहीचे कौतुक जास्त होतेय, हे वरिष्ठ पातळीवरील प्रशासकीय अधिकाऱ्याचे विधान धक्कादायक आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही व्यवस्थेत हे अतिशय बेजबाबदार विधान आहे. त्याचा तीव्र निषेध. भारतातील लोकशाही व्यवस्थेचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अमिताभ कांत यांनी याच कार्यक्रमात कृषी कायद्यांचेही जोरदार समर्थन केले. कृषी क्षेत्रात सुधारणांची आवश्यकता आहे. हमीभावाची व्यवस्था कायम राहील. कृषी उत्पन्न बाजार समित्या जसे काम करत आहेत, त्या तश्याच करत राहतील. शेतकऱ्यांना आपल्या इच्छेनुसार शेतमाल विक्री करण्याचा पर्याय उपलब्ध असला पाहिजे, असेही ते म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा