अजितदादांसोबत गेलेल्या राष्ट्रवादीच्या काही आमदारांची शरद पवारांकडे पुन्हा ‘घरवापसी’

0
429
बारामतीत शरद पवारांच्या समर्थनार्थ असे पोस्टर्स झळकले .

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याशी हातमिळवणी करून भाजपने देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी घडवून आणल्याच्या घटनेला काही तास उलटत नाहीत तोच अजित पवारांसोबत राजभवनावर गेलेले काही आमदार शरद पवारांकडे पुन्हा परत फिरले आहेत. कोणतीही पूर्वकल्पना न देता आम्हाला विश्वासघाताने  राजभवनावर नेण्यात आले होते. आम्ही पक्षासोबतच आहोत, असे या आमदारांनी स्पष्ट केले आहे. अजित पवारांकडून पुन्हा शरद पवारांकडे आलेल्या आमदारांत बीडचे संदीप क्षीरसागर, बुलढाण्याचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, सुनिल शेळके, सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांचा समावेश आहे. आता परळीचे आमदार धनंजय मुंडे, झिरवळ- दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवळ, निफाडचे आमदार दिलीप बनकर, अनिलभाईदास पाटील या आमदारांची भूमिका अद्यापही स्पष्ट झालेली नाही. ते संपर्कक्षेत्राच्या बाहेर आहेत.

आम्हाला शुक्रवारी रात्री अजित पवारांचा फोन आला. सकाळी सात वाजता धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर या, महत्वाचे बोलायचे आहे, असे त्यांनी सांगितले. विधिमंडळ पक्षनेते म्हणून आम्ही त्यांचा आदेश पाळला. धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर पोहोचल्यावर दहा- पंधरा मिनिटांनी आणखी काही आमदार तेथे आले. चर्चा करायची आहे, असे सांगून आम्हाला राजभवनावर नेण्यात आले. तेथे एका छोट्या हॉलमध्ये आम्हाला बसवण्यात आले. शपथविधीचा आम्हाला थांगपत्ता नव्हता. थोड्यावेळ्याने देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि भाजपचे नेते तेथे आले आणि शपथविधी झाला, असे या आमदारांनी कालपासून घडलेल्या घटनाक्रमाबाबत सांगितले. आम्ही पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात नाही, असेही या आमदारांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे हे नेते कोणासोबत?

 राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे धनंजय मुंडे, जयंत पाटील, सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे मोठे नेते काय भूमिका घेतात, यावर महाराष्ट्राच्या आगामी राजकारणाची पुढील समीकरणे ठरणार आहेत. जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल हे शरद पवारांचे कट्टर समर्थक आहेत. तर धनंजय मुंडे यांचे शरद पवार आणि अजित पवार यांच्याशीही जवळचे संबंध आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर हे नेते कोणासोबत जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सध्या तरी आमदारांची घरवापसी होत असल्यामुळे भाजपने घडवून आणलेला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा शपथविधी औटघटकेचा ठरतो की काय, अशी शंका घेतली जाऊ लागली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा