हीच ती मोदींनी उल्लेख केलेली ‘आंदोलनजीवी’ जमातः राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल

0
351

मुंबईः तीन कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देणाऱ्यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘आंदोलनजीवी जमात’ संबोधून केलेल्या टिकेला राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकरी आंदोलनावर बोलताना या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांची ‘आंदोलनजीवी जमात’ अशी संभावना केली होती. त्या टिकेला राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्युत्तर दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने ट्विटर हॅण्डलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत प्रारंभी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संसदेत बोलताना आंदोलनजीवी जमात अशी विरोधकांवर टीका करताना दाखवण्यात आले आहे. त्यानंतर भाजपने केलेल्या वेगवेगळ्या आंदोलनाचे फोटो आणि व्हिडीओ यात टाकण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे गॅस दरवाढीच्या आंदोलनापासून ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, किरिट सोमय्या हे आंदोलनाबाबत बोलताना दिसत आहेत. या व्हिडीओवर ‘ही पहा, हीच ती प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी उल्लेख केलेली नवीन आंदोलनजीवी जमात’ अशी कॅप्शन टाकण्यात आली आहे.

अशोक चव्हाणांनीही घेतला आक्षेपः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वापरलेल्या ‘आंदोलनजीवी’ या शब्दावर काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनीही आक्षेप घेतला आहे. ‘प्रधानमंत्र्यांचा आंदोलनजीवी हा शब्द अजिबात स्वीकारार्ह नाही. या शब्दातून आंदोलनावर जगणारा असा अर्थ ध्वनित होतो. हा उपरोधिक शब्द शेतकरी आंदोलनाबाबत वापरला गेला. पण शेतकरी हा कोणताही ‘जीवी’ नाही तर मानवतेला ‘जीवि’त ठेवणारा महत्वपूर्ण घटक आहे. त्यांचा असा अवमान करणे निंदनीय आहे,’ असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले होते मोदी?: राज्यसभेत बोलताना प्रधानमंत्री मोदी म्हणाले होते, ‘ श्रमजीवी, बुद्धीजीवी यासारखे शब्द आपल्या खूप परिचयाचे आहेत. मात्र मी पाहतोय गेल्या काही दिवसांपासून या देशात नवी जमात उदयाला आली आहे. ती म्हणजे आंदोलनजीवी. वकिलांचे, विद्यार्थ्यांचे, कामगारांचे, कुणाचेही आंदोलन असेल तर हे आंदोलनजीवी सर्व ठिकाणी उपस्थित असतात. हे कधी पडद्यामागे तर कधी पडद्याच्या पुढेही असतात. यांची एक टोळी आहे. हे लोक आंदोलनाशिवाय जगू शकत नाहीत. आंदोलनासोबत जगण्यासाठी ते मार्ग शोधत असतात. आपल्याला अशा लोकांना ओळखायला हवे.’

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा