राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा हादरा, साताऱ्याचे खासदार उदयनराजेंची भाजप प्रवेशाची घोषणा

0
136

साताराः राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होत असली तरी शुक्रवारी त्यांनी स्वतःच  ट्विटरवर एक पोस्ट करून आपल्या भाजप प्रवेशाची जाहीर घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा उदयनराजे यांनी या ट्विटमध्ये केली आहे.

उदयनराजे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा जोर धरू लागल्याच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी उदयनराजे यांची भेट घेतली होती. पवारांच्या मनधरणीनंतर  उदयनराजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रहाणार असल्याचे मानले जात होते. परंतु गणेश विसर्जनानंतरच्या दुसर्‍याच दिवशी उदयनराजेंनी राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या संबंधांचे विसर्जन करून भाजपची वाट धरत असल्याची घोषणा करून टाकली आहे. उदयनराजेंचा भाजप प्रवेश पश्‍चिम महाराष्ट्र बालेकिल्ला असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला जबरदस्त हादरा असल्याचे मानले जात आहे. विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत,तसतसे काँग्रेस आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकेक भक्कम तटबंदी कोसळत चालल्या आहेत. भाजपमध्ये सर्वाधिक इनकमिंग राष्ट्रवादीतूनच झाले असून काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांचे अत्यंत जवळचे नातेवाईक डॉ. पद्मसिंह पाटील व त्यांचे पुत्र राणा जगजितसिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे. पद्मसिंह पाटील यांच्या बहिणीचा विवाह शरद पवार यांचे पुतणे व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याशी झालेला आहे.

 उदयनराजे यांनी या ट्विटसोबतच एक पोस्टर शेअर करून आजपर्यंत आपण सर्वांनी दिलेले प्रेम आणि आशीर्वाद याच्या बळावर मला समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळत राहील. आपले प्रेम आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी राहील, अशी अपेक्षा असल्याचे उदयनराजे यांनी म्हटले आहे. शनिवारी मोदींच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या दुसर्‍याच दिवशी उदयनराजे शनिवारी, १४ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेतही सहभागी होणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा