राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली उमेदवार यादी : परळीतून धनजंय मुंडे, बीडमधून संदीप क्षीरसागर मैदानात

0
132

बीड : अनेक दिग्गज नेते पक्ष सोडून भाजप- शिवसेनेत गेल्यामुळे धक्क्यांवर धक्के सोसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची वाट न पाहताच बुधवारी पहिली उमेदवार यादी जाहीर करून टाकली. पक्षसोडीच्या आजाराने ग्रासलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची बांधबंदिस्ती करण्यासाठी स्वतःच मैदानात उतरून राज्यव्यापी दौऱ्यावर  निघालेल्या पक्षाध्यक्ष शरद पवारांनी बीड जिल्ह्यातील पाच उमेदवारांची यादी जाहीर केली. पवारांच्या या घोषणेमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. शिवसेना- भाजप युतीला टक्कर देण्यासाठी  विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह तुल्यबळ उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसने मैदानात उतरवले असून या निवडणुकीत धनंजय मुंडे विरुद्ध भाजपच्या पंकजा मुंडे अशी चुरशीची लढत परळी मतदारसंघातून पहायला मिळणार आहे.

अनेक नेते सोडून गेल्यामुळे पक्षात असलेल्या नेते व कार्यकर्त्यांना नवा विश्‍वास देण्यासाठी शरद पवार राज्याच्या दौऱ्यावर निघाले आहेत. बुधवारी बीड दौऱ्यावर त्यांनी पत्रकार परिषदेत ही पहिली उमेदवार यादी जाहीर केली. या यादीनुसार परळीतून धनंजय मुंडे, गेवराईतून विजयसिंह पंडित, बीडमधून संदीप क्षीरसागर, माजलगावातून माजी मंत्री प्रकाश सोळंके व केजमधून नमिता मुंदडा राष्ट्रवादीच्या तिकिटावर विधानसभा निवडणुकीच्या मैदानात लढणार आहेत.

परळीत रंगणार बहीण-भाऊ सामना

शरद पवारांनी भाजप-शिवसेनेच्या फोडाफोडीच्या राजकारणाला शह देण्यासाठी उमेदवारांची निवड करताना खूपच काळजी घेतली आहे. राष्ट्रवादीचे आक्रमक नेते धनंजय मुंडे यांना परळी विधानसभा मतदारसंघातून मैदानात उतरवण्यात आले आहे. भाजप नेत्या आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा हा मतदारसंघ असून या निवडणुकीत पंकजा-धनंजय अशी बहीण-भावातील चुरशीची लढत या मतदारसंघात पहायला मिळणार आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केलेल्या आणि मंत्रिपदाची माळ गळ्यात पाडून घेतलेल्या जयदत्त क्षीरसागरांना शह देण्यासाठी  शरद पवारांनी त्यांचेच पुतणे संदीप क्षीरसागर यांना बीडमधून मैदानात उतरवले आहे. त्यामुळे याही मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.

 पवार म्हणाले होते मला काही नेत्यांकडे पहायचे आहे…

सोलापुरात मंगळवारी कार्यकर्त्यांना विश्‍वास देताना शरद पवारांनी जे पक्ष सोडून गेले आहेत. त्यांची चिंता करून नका आणि त्यांच्यावर फारशी चर्चाही करू नका. जे सोडून गेले ते लवकरच इतिहासजमा होणार आहेत. मला आता काही लोकांकडे पहायचे आहे, असा दमच पक्ष सोडून गेलेल्यांना भरला होता. शरद पवारांनी ठरवले तर ते राज्यातील कोणत्याही निवडणुकीत कोणत्याही उमेदवाराला पराभूत करू शकतात, एवढी ताकद त्यांच्या व्यूहरचनेत असते, असा आजवरचा इतिहास असल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या अशा हिटलिस्टवर कोण कोण नेते येतात, हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा