फुले, शाहू, आंबेडकरांच्या दृष्टिकोनातून समाज मानसिकता घडवावी लागेलः शरद पवार

0
100
छायाचित्रः Twitter/@PawarSpeaks

मुंबई शाहू, फुले, आंबेडकर यांचे केवळ नाव घेउन चालणार नाही तर त्‍यांनी जे विचार दिले, जी दृष्‍टी दिली त्‍या दृष्टिकोनातून काम करून त्‍या विचारांना पुढे नेणारी एक नवी पिढी तयार करण्याचे आव्हान आपल्‍याला स्‍वीकारावे लागेल. त्यांच्या दृष्टिकोनातून समाज मानसिकता घडवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्‍यांच्या विचारांना पुढे नेणारे समृद्ध व विचारी कार्यकर्ते घडवून त्‍यांच्या माध्यमातून एक प्रगत समाज घडवावा लागेल, असे मत राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्‍त केले.

शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसाच्या निमित्‍त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एका व्हर्च्युअल कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्‍यावेळी शरद पवार बोलत होते. कोरोनाकाळ असल्यामुळे वाढदिवसाचा कार्यक्रम घेण्याचे मी टाळत होतो. पण जयंतरावांनी डिजिल कार्यक्रमाद्वारे एका ठिकाणी सर्व राज्यातील नेत्यांना, कार्यकर्त्यांना एकत्र आणायची संकल्पना मांडली, त्यामुळे मला नाही म्हणता आले नाही. आजच्या कार्यक्रमाच्या नियोजनात नवीन पिढी काम करताना दिसली याचा आनंद आहे. हीच नवीन पिढी पुढे राज्यात काम करेल असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

शाहू, फुले, आंबेडकर यांनी एक विज्ञानवादी, सुधारणावादी विचार अंगीकारला. ब्रिटनचे राजे पंचम जॉर्ज जेव्हा मुंबई दौऱ्यावर आले होते तेव्हा महात्‍मा फुले यांनी शेतीविषयात बी-बियाण्यांपासून काय सुधारणा करणे आवश्यक आहे त्‍याचे निवेदन पंचम जॉर्ज यांना दिले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला घटना दिली. एक भक्‍कम अशी व्यवस्‍था दिलीच, पण त्‍याचसोबत त्‍यांनी इतर अनेक क्षेत्रात भरीव काम केले आहे. ब्रिटीश काळात ते स्‍थानिक सरकारमध्ये पाणीविषयक आणि वीजविषयक खात्‍याचे मंत्री होते. तेव्हा त्‍यांनी धरणांची उपयुक्‍तता सांगितली होती. त्‍याचसोबत विद्युत निर्मिती करून ती आंतरराज्‍य ग्रीड निर्माण करून पुरवली पाहिजे यावरही त्‍यांनी काम केले होते. फुले, शाहू, आंबेडकरांच्या याच विचारांना पुढे नेणारी पिढी तयार करण्याचे कार्य आपल्‍याला करायचे आहे असे शरद पवार म्‍हणाले.

स्वातंत्र्यपूर्व काळात त्यावेळच्या गांधी-नेहरूंच्या विचारांची पताका घेऊन काम करण्याचे सूत्र माझ्या आईने स्वीकारले. ते काम करत असताना कौटुंबिक जबाबदारी सुद्धा कटाक्षाने पाळली पाहिजे, ही भूमिका देखील आयुष्यभर निभावली. याचा लाभ म्हणून आम्हाला जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन लाभला असेही शरद पवार म्हणाले. यावेळी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनिल तटकरे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, अल्पसंख्याक मंत्री व मुंबई अध्यक्ष नवाब मलिक, खासदार फौजिया खान, खासदार सुप्रियाताई सुळे, माजी आमदार हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वरपे, सूरज चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, एलजीबीटी सेलच्या प्रदेशाध्यक्षा प्रिया पाटील, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, मुख्य प्रवक्ते महेश तपासे, चिटणीस संजय बोरगे, मुंबई युवती अध्यक्षा अदिती नलावडे आदी उपस्थित होते.

ही जनतेनेच दिलेली संधीः मी आज ५०-५५ वर्षे राज्यात काम करतोय. ही संधी जनतेने मला दिलीय. जनतेने साथ दिलीय म्हणून इथपर्यंत आल्याची प्रामाणिक कबुली शरद पवार यांनी दिली. जीवनाचं सुत्र स्वीकारलं आहे त्या  जीवनाच्या रस्त्यावर जाण्याचं प्रोत्साहन आपल्या मिळत असतं. सार्वजनिक जीवनात काम करत असताना शेवटच्या माणसाच्या जपणुकीचं काम करता आलं पाहिजे. त्यातून आपण शिकत असतो असेही पवार म्हणाले.

हिमालयाच्या उंचीच्या ‘सह्याद्री’ ला शुभेच्छा-अजित पवारःहिमालयाच्या उंचीच्या ‘सह्याद्री’ ला हार्दिक शुभेच्छा अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांचे अभिष्टचिंतन केले. १२ डिसेंबर हा आपल्या सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे. तो क्षण आज आपण एकत्र घालवला याचा आनंद होतो. राज्यात मोठ्या प्रमाणावर रक्ताचा तुटवडा भासत आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबीर आयोजित केले आहेत. हे काम आपल्याला पुढे न्यायचे आहे. शेवटी पवारसाहेबांची शिकवण आहे की, राज्यावर संकट आल्यानंतर आपण धावून गेले पाहिजे. मागच्या ५० वर्षांपासून आपण पवारसाहेबांना सामाजिक जीवनात काम करताना पाहतोय. ८० व्या वर्षीही ते त्याच ताकदीने काम करत आहेत. मला तर वाटतं, पवारसाहेबांसारखा नेता या शतकात तरी होणार नाही. पवारसाहेबांसारखे नेते आपल्याकडे आहेत, याचा मला अभिमान आहे असेही अजित पवार म्‍हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा