16 डिसेंबरपासून एनईएफटीचे व्यवहार 24 तास, सुटीच्या दिवशीही करता येतील व्यवहार !

0
92
प्रतिकात्मक छायाचित्र.

मुंबईः डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी 16 डिसेंबरपासून नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर म्हणजेच एनईएफटी सेवा 24 तास सुरू करण्याचे निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकेने देशातील सर्वच बँकांना दिले आहेत. या 24 तास सेवेची सुरूवात 16 डिसेंबर रोजी मध्यरात्री 12 वाजून 30 मिनिटांनी होईल. विशेष म्हणजे सार्वजनिक सुटीच्या दिवशीही एनईएफटी सेवा सुरू राहणार असल्याने बँक ग्राहकांना कधीही आर्थिक व्यवहार करता येणार आहेत.

सध्या सकाळी 8 वाजेपासून सायंकाळी 7 वाजेपर्यंतच एनईएफटीद्वारे एका बँक खात्यातून दुसर्‍या बँक खात्यात पैसे पाठवता येतात. पहिल्या आणि तिसर्‍या शनिवारी ही सेवा फक्त दुपारी 1 वाजेपर्यंत म्हणजेच फक्त अर्धादिवसच सुरू असते. येत्या 16 डिसेंबरपासून आठवड्यातील सातही दिवस आणि 24 तास एनईएफटी सेवा सुरू राहणार आहे. या बाबतची अधिसूचना भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केली आहे. एनईएफटीचे व्यवहार विनाअडथळा पूर्ण होण्यासाठी बँकांनी त्यांच्या करंट अकाऊंटमध्ये पुरेशी रोकड सुलभता ठेवावी, असेही या अधिसूचनेत म्हटले आहे. एनईएफटी सेवा 24 तास उपलब्ध झाल्याची माहिती ग्राहकांना कळवण्याची जबाबदारीही बँकांवर टाकण्यात आली असून या बाबतची सूचना बँकांच्या दर्शनी भागात लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेने  एनईएफटी आणि आरटीजीएस या दोन्ही व्यवहारांवरील शुल्क जुलैपासून रद्द केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा