भगवान बुद्धांच्या जन्मस्थळावरून वाद, परराष्ट्र मंत्र्यांच्या विधानावर नेपाळचा तीव्र आक्षेप

0
228
संग्रहित छायाचित्र.

काठमांडूः भारत आणि नेपाळमध्ये सीमावादानंतर आता जन्मस्थळांवरून वाद सुरू झाला आहे. भगवान गौतम हे बुद्ध जगभरातील लोकांसाठी दोनपैकी एक थोर भारतीय होते, असे भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले होते. त्यावर नेपाळने तीव्र आक्षेप घेतला असून बौद्ध धम्माचे संस्थापक गौतम बुद्ध हे नेपाळमध्येच जन्मले होते, याचे ऐतिहासिक आणि पुरातत्वीय पुरावे आहेत, असे नेपाळने म्हटले आहे.

 जयशंकर यांच्या वक्तव्यानंतर नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने आज एक निवेदन जारी केले आहे. नेपाळमधील लुंम्बिनी हेच बुद्धांचे जन्मस्थळ होते, ही ऐतिहासिक आणि पुरातत्वीय पुराव्यानिशी सिद्ध झालेली आणि नाकारता न येणारी वस्तुस्थिती आहे. बुद्धाचे जन्मस्थळ आणि बौद्ध धम्माचे मूळ उगमस्थान नेपाळमधील लुम्बिनी युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत आहेत, असे नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

 सीआयआयने शनिवारी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी भारताची सॉफ्ट पॉवर सांगताना भगवान गौतम बुद्ध आणि महात्मा गांधी हे जगभरातील लोकांसाठी संस्मरणीय असे थोर भारतीय आहेत, असे म्हटले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये नेपाळच्या संसदेला संबोधित करताना जगातील शांतिदूत बुद्धाचा जिथे जन्म झाला, असा नेपाळ हा देश असल्याचे म्हटले होते, असा हवालाही नेपाळ परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिला आहे.

नेपाळमधून नंतरच्या काळात जगाच्या अन्य भागात बौद्ध धम्माचा प्रसार झाला. या बद्दल कोणताही वाद नाही, त्यामुळे त्यावर चर्चा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आंतरराष्ट्रीय समुदायालाही हे चांगले माहीत आहे, असे प्रवक्ता म्हणाला.

नेपाळच्या आक्षेपावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. परराष्ट्र मंत्र्यांचे वक्तव्य भारतात असलेल्या बौद्ध वारसास्थळांच्या संदर्भात होते. गौतम बुद्धांचा जन्म लुम्बिनीमध्येच झाला होता आणि ते नेपाळमध्ये आहे, याबद्दल कोणतीही शंका नाही, असे श्रीवास्तव म्हणाले.

विशेष म्हणजे गेल्या महिन्यात नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी प्रभू रामचंद्र भारतीय नसून नेपाळी असल्याचा दावा केला होता. रामाचे जन्मस्थळ असलेली खरी अयोध्या नेपाळमध्येच असल्याचे ते म्हणाले होते. नेपाळ हा सांस्कृतिक दडपशाहीचा बळी ठरल्याचेही त्यांनी सांगितले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा