राज्यातील विद्यापीठांचे नवे शैक्षणिक वर्ष १८ नोव्हेंबरपासून सुरू होणार

0
8

नवी दिल्लीः कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे विस्कळित झालेली शिक्षणाची घडी सुरळीत करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) हळूहळू पावले उचलण्यास सुरूवात केली असून देशभरातील विद्यापीठांतील प्रथम वर्षाचे नवे शैक्षणिक वर्ष १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय यूजीसीने घेतला आहे. राज्यातील विद्यापीठे १८ नोव्हेंबरपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करू शकणार आहेत.

ज्या विद्यापीठांतील प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया आणि निकालाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही, त्यांना १८ नोव्हेंबरपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याची मुभा देण्यात आली आहे. यूजीसीच्या समितीने ही शिफारस केली. साधारणतः जून- जुलैमध्ये नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होते. मात्र कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे ते अद्यापही सुरू होऊ शकलेले नाही. हा बुडालेला कालावधी भरून काढण्यासाठी सत्राअखेरीस फक्त आठवडाभराच्या सुट्या देण्यात येणार आहेत.

यूजीसीच्या समितीने सूचवलेल्या शिफरशींनुसार, ८ ते २६ मार्च २०१२१ दरम्यान पहिल्या सत्राच्या परीक्षा होतील. त्यापूर्वी १ ते ७ मार्चदरम्यान आठवडाभराची सुटी देण्यात येईल.२७ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान पहिल्या सत्राअखेरची सुटी देण्यात येईल. ५ एप्रिल २०२१ पासून दुसरे सत्र सुरू होईल.

दुसऱ्या सत्र परीक्षेपूर्वी १ ते ८ ऑगस्ट २०२१ या कालावधीत दुसऱ्या सत्र परीक्षेपूर्वी सुटी देण्यात येईल. ९ ते २१ ऑगस्ट २०२१ या कालावधीत दुसऱ्या सत्राच्या परीक्षा घेण्यात येतील. २२ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट २०२१ दरम्यान दुसऱ्या सत्राअखेरच्या सुट्या देण्यात येतील. या तुकडीचे पुढील शैक्षणिक वर्ष ३० ऑगस्ट २०२१ पासून सुरू होईल, असे यूजीसीच्या समितीने दिलेल्या अहवालात म्हटले आहे.

नव्या शैक्षणिक वर्षाचे सुधारित वेळापत्रक तयार करण्यासाठी नेमलेल्या समितीच्या अहवालास यूजीसीने मान्यता दिली आहे. त्यानुसार १ नोव्हेंबरपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होईल. परंतु महाराष्ट्रातील परीक्षा आणि निकालाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील विद्यापीठांचे नवीन शैक्षणिक वर्ष १८ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येईल, असे यूजीसीचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा