भारतात आढळले ब्रिटनच्या कोरोना स्ट्रेनने बाधित ६ रुग्ण, महाराष्ट्रात अद्याप शिरकाव नाही

0
97

नवी दिल्ली/ मुंबईः आधीच्या कोरोनापेक्षा ७० टक्के जास्त वेगाने फैलाव होणाऱ्या ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने बाधित झालेले सहा रुग्ण भारतात आढळून आले आहेत. त्यामुळे नववर्षाच्या तोंडावरच भारताची चिंता वाढली आहे. दिलासादायक बाब म्हणजे ब्रिटनच्या या नव्या कोरोना विषाणूचा महाराष्ट्रात अद्याप तरी शिरकाव झाल्याचे आढळून आलेले नाही. दरम्यान, या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनहून येणाऱ्या विमानांवर घालण्यात आलेली तात्पुरती बंदी वाढण्याची शक्यता आहे.

ब्रिटनहून आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या नमुन्यांचे अहवाल देशातील विविध प्रयोगशाळांकडून जाहीर करण्यात आले आहेत. त्यात सहा जणांना ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या सहा जणांमध्ये महाराष्ट्रातील एकाही रुग्णाचा समावेश नाही. महाराष्ट्रातील ३० जणांच्या स्वॅब पुण्याच्या एनआयव्ही प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या अहवालांची प्रतीक्षा असून ते येईपर्यंत महाराष्ट्रात धाकधूक कायम राहणार आहे.

 बेंगळुरूच्या प्रयोगशाळेत तीन, हैदराबादच्या प्रयोगशाळेत दोन आणि पुण्याच्या एनआयव्ही प्रयोगशाळेत एका नमुन्यान ब्रिटनमधील कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आला आहे. या सर्व रुग्णांना सरकारी निगराणीत अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्यांनाही संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यांच्या सहप्रवाशांचा आणि संपर्कात आलेल्या व्यक्तींचाही शोध घेण्यात येत आहे.

ब्रिटनमध्ये आढळलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन अत्यंत वेगाने फैलावतो. त्यामुळे तो अत्यंत धोकादायक असल्याचे सांगण्यात येत आहे. या स्ट्रेनचा झपाट्याने फैलाव होत असल्यामुळे ब्रिटनमध्ये पुन्हा कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. भारतातही खबरदारी म्हणून ब्रिटनहून भारतात आलेल्या नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत आहे. तसेच त्यांचे स्वॅब नव्या कोरोना स्ट्रेनच्या चाचणीसाठी जिनोम सिक्वेंसिंगसाठी प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यात येत आहेत.

महाराष्ट्रात ३० जण पॉझिटिव्हः ब्रिटनहून महाराष्ट्रात आलेले ३० जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यांचे स्वॅब पुण्याच्या एनआयव्ही प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. सर्वाधिक १२ कोरोना बाधित मुंबईत आढळले आहेत. पुण्यात ३, नागपुरात ४, औरंगाबाद आणि बुलढाण्यात प्रत्येकी २ आणि नांदेड, नाशिक, रायगडमध्ये प्रत्येकी एक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत ब्रिटनहून ३ हजार ५७७ प्रवासी महाराष्ट्रात आले आहेत. त्यापैकी १ हजार ९८० जणांची आरटीपीसीआर चाचणी घेण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा