शिवसेनेच्या ‘अजान’ स्पर्धेवरून नवा वादः भाजपकडून टीका, राष्ट्रवादीकडून पाठराखण

0
55
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबई शिवसेनेने आयोजित केलेल्या अजान पठण स्पर्धेवरून नवा वाद निर्माण झाला आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने भाजपने शिवसेनेवर टीका केली आहे. सत्ता टिकवण्यासाठी शिवसेनेने आपल्या मूळ आचार विचाराला तिलांजली देण्याकडे वाटचाल सुरु केली आहे, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. तर भाजपला धर्माचा चष्मा लावल्याशिवाय जमत नाही, असा टोला लगावत राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेची पाठराखण केली आहे.
शिवसेनेचे दक्षिण मुंबई विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी अजान पठण स्पर्धेचे आयोजन केले आहे. मुस्लिम समाजातील लहान मुलांना अजानची गोडी लागावी यासाठी ही स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे सकपाळ यांनी सांगितले. नेमका हाच मुद्दा पकडत भाजपने शिवेसेनेवर टीका केली आहे. भाजपने नेमका हाच मुददा पकडत हिंदुत्वावरून शिवसेनेला पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे. सत्तेसाठी शिवसेनेचे स्वरुप बदलत आहे. शिवसेनाप्रमुख प्रत्येक धर्म प्यारा असे बोलले असतील, परंतु त्यांची पालखी उचला असे ते कधी बोलले नाहीत. शिवसेनाप्रमुखांनी नेहमी त्यांच्या आचारविचारावर टीका केली. पण सत्तेच्या नादात मानवतेचा उल्लेख करून हिंदुत्वाची भूमिका सरमिसळ झाल्याचे सकपाळ यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होते, असेही दरेकर म्हणाले.
अजान एका धर्माची भावना-सकपाळः ‘अजान एका धर्माची भावना आहे. अजानमध्ये खूप गोडवा आहे. त्यामुळे मनःशांती मिळते. मी बडा कब्रस्तानच्या शेजारी राहतो. त्यामुळे माझ्या कानावर रोजच अजान पडते. पाच मिनिटाच्या अजानमुळे कुणाला त्रास होत असेल तर ही गोष्ट मिठाच्या खड्यासारखी समजून त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे’. ‘अजान देणाऱ्या मुलांचे उच्चार, त्यांचा आवाज आणि पाठांतर पाहून त्यांना बक्षीस दिले जाईल. यासाठी मौलाना परीक्षकाचे काम पाहतील. स्पर्धेचा सर्व खर्च शिवसेना करणार आहे,’ अशी माहिती सकपाळ यांनी दिली आहे. ‘महाआरतीप्रमाणेच अजानचे महत्त्व आहे. प्रेम आणि शांतीचे ते प्रतीक आहे. त्यावर वाद घालणे उचित वाटत नाही,’ असेही ते म्हणाले.
भाजपला धर्माचा चष्मा लावल्याशिवाय जमत नाही – नवाब मलिकः देशात कलेला आणि अभिनयाला धर्माचा चष्मा लावणे योग्य नाही. मात्र भाजपला धर्माचा चष्मा लावल्याशिवाय जमत नाही, असा टोला लगावत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी अजान स्पर्धेला आक्षेप घेणाऱ्या भाजपला आपल्या भाषेत उत्तर दिले आहे. सोलापूर व इतर जिल्हयात घेण्यात आलेल्या गीतापठण कार्यक्रमात मुस्लिम मुलींनी पहिला क्रमांक पटकावला होता. ही सत्य परिस्थिती आहे याची आठवणही नवाब मलिक यांनी यावेळी भाजपला करुन दिली. दिलीप कुमार, शाहरुख खान, सलमान खान यांनी सिनेमामध्ये अनेक भूमिका केल्या आहेत. शिवाय मंदिरामध्ये सीनही केले आहेत याचा अर्थ त्यांनी धर्मांतर केले आहे, असे होत नाही असेही मलिक म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा