आता शहरी भागातही नवीन स्वस्त धान्य दुकाने सुरू करता येणार, शहरी जनतेला मोठा दिलासा

0
290
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबई: राज्यातील कोरोना या आजारामुळे निर्माण झालेली परिस्थिती तसेच जुलै व ऑगस्टमध्ये राज्यात झालेली अतिवृष्टी लक्षात घेता आता शहरी भागातही नवीन स्वस्त धान्य दुकाने सुरू करण्यात येणार आहेत.  हा निर्णय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नाने घेण्यात आला आहे.

राज्य शासनाकडून स्वस्त धान्य दुकानदारांच्या उत्पन्नात वाढ करण्याकरता स्वस्त धान्य दुकानांची पुर्नरचना करण्याबाबतची कार्यवाही यापूर्वी करण्यात आली होती. मात्र या कार्यवाहीला लागणारा कालावधी लक्षात घेता २०१८ मध्ये शहरी भागात नवीन दुकाने वितरणाच्या जाहिरनाम्यास स्थगिती देण्यात आली होती.  ही स्थगिती आता उठवण्यात आली आहे त्यामुळे शहरी भागातही आता स्वस्त धान्य दुकाने सुरू होणार आहेत.

आवश्य वाचाः  चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

सद्यस्थितीत कोरोना विषाणू संसर्गाने राज्यातील गरीब व गरजू लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शहरी भागातील अशी लोकसंख्या अधिक आहे. तसेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे या कालावधीत स्वस्त धान्य दुकानांमार्फत राज्यातील गोरगरीब जनतेला अन्नधान्य तसेच केरोसिन वाटपाचे महत्वपूर्ण कार्य चालू ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, असे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण मंत्री छगन भुजबळ म्हणाले.

राज्यात जुलै व ऑगस्टमध्ये झालेल्या पावसामुळे अनेक शहरात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरी भागातील अनेक ठिकाणी नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत तेथे सरकारी मदत अन्नधान्याच्या स्वरूपात स्वस्त धान्य दुकानदारांच्या माध्यमातून देणे अनिवार्य असून शहराची मूळ परिस्थिती पूर्वपदावर आणणे ही शासनाची जबाबदारी ठरते, अशी माहितीही भुजबळ यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा