‘बाटु’चे नवनियुक्त कुलगुरू डॉ. कारभारी काळे राज्यपालांच्या भेटीला, चर्चा गुलदस्त्यात!

0
337

मुंबईः लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे (बाटु) नवनियुक्त कुलगुरू डॉ. कारभारी विश्वनाथ काळे आज (गुरूवारी) अचानक राजभवनावर पोहोचले आणि त्यांनी राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.  ही सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात येत असली तरी डॉ. काळे यांची कुलगुरूपदी झालेल्या नियुक्तीवरच घेण्यात येत असलेल्या आक्षेपांची या भेटीला पार्श्वभूमीवर आहे. त्यामुळे ही भेट शैक्षणिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्राध्यापक डॉ. कारभारी काळे यांची बाटुच्या कुलगुरूपदी नियुक्ती केली आहे. त्यांनी नुकताच कुलगुरूपदाची सूत्रेही स्वीकारली आहेत. मात्र डॉ. काळे यांची औरंगाबादच्या विद्यापीठातील प्रपाठकपदी झालेली नियुक्तीच नियमबाह्य आणि त्या नियमबाह्य नियुक्तीवर केलेल्या अध्यापन अनुभवाच्या आधारे मिळालेली प्रोफेसरपदी पदोन्नतीही बेकायदेशीर असल्यामुळे त्यांच्या कुलगुरूपदी झालेल्या निवडीवर आक्षेप घेण्यात येत आहेत. ‘न्यूजटाऊन’ने विविध चौकशी समित्यांचे अहवाल आणि डॉ. काळे यांच्या सेवापुस्तिकेतील नोंदीसह सविस्तर वृत्तांत प्रसिद्ध केले आहेत.

हेही वाचाः राजभवनाची दिशा’भूल’ की मेहरबानी?: ‘बाटु’च्या कुलगुरूपदी डॉ. काळे यांची नियुक्ती वादग्रस्त

डॉ. काळे यांच्या नियुक्तीबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी डॉ. आर. एस. माळी आणि डॉ. मालदार या दोन माजी कुलगुरूंची चौकशी समिती नियुक्त केली होती. या समितीने डॉ. काळे यांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचा अहवाल विद्यापीठाला सादर केला आहे.

हेही वाचाः ‘बामु’तील १२७ कोटींच्या घोटाळ्यात ‘बाटु’चे नवे कुलगुरू काळेंच्या ३७ लाखांच्या खरेदीवर ठपका

विधिमंडळाच्या अधिवेशनात या विदयापीठातील नियमबाह्य नियुक्त्यांबद्दल उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधीसूचनेला दिलेल्या आश्वासनानुसार तत्कालीन राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीनेही डॉ. काळे यांची प्रोफेसरपदी झालेली नियुक्ती नियमबाह्य असल्याचे निरीक्षण नोंदवत डॉ. काळे यांची पात्रता तपासून त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याची शिफारस केली होती.

हेही वाचाः तदर्थ प्राध्यापकांच्या सुरस कथाः संगणकशास्त्राच्या धोपेश्वरकरांना ८ वेळा अवैध मुदतवाढ, आता कायम

याच विद्यापीठातील आर्थिक अनियमिततेची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने २०१७ मध्ये नियुक्त केलेल्या डॉ. आर. एस. धामणस्कर समितीने डॉ. काळे यांनी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान विभागाचे विभागप्रमुख म्हणून केलेली ३७ लाख ७१ हजार ४७० रुपयांहून अधिकची साधनसामुग्री खरेदीची प्रक्रिया नियमबाह्य आणि सदोष ठरवली होती. या प्रकरणी १५ दिवसांत एफआयआर दाखल करण्याचे आश्वासन नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारने दिले आहे.

चला उद्योजक बनाः शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून कर्ज/सबसिडी मिळवायची?, पण कशी? वाचा सविस्तर

या सर्व पार्श्वभूमीवर एवढ्या ‘स्वच्छ’ प्रतिमेच्या आणि मूळ नियुक्तीच्या वेळीच अपात्र असलेल्या डॉ. काळे यांची बाटुच्या कुलगुरूपदी वर्णी कशी काय लागली? असे सवाल केले जात असतानाच डॉ. काळे यांनी आज राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याचे राजभवनाकडून सांगण्यात आले आहे. उभयतांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील कळू शकला नाही. डॉ. काळे यांना राज्यपालांनी बोलावून घेतले होते की, डॉ. काळे यांनी स्वतः होऊनच ही ‘सदिच्छा’ भेट घेऊन राज्यपालांशी चर्चा केली हेही स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजभवनातूनच डॉ. काळे यांना भेटीचा सांगावा धाडण्यात आला होता. त्यांच्या या भेटीला त्यांच्या नियुक्तीवर घेण्यात येत असलेल्या आक्षेपांचा पार्श्वभूमी असल्याने ही ‘सदिच्छा’ भेट शैक्षणिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा