ब्रिटनमध्ये आढळला पहिल्यापेक्षा ७० टक्के जास्त वेगाने फैलावणारा कोरोना विषाणू, जगभर खळबळ

0
1263
प्रतिकात्मक छायाचित्र.

नवी दिल्लीः ब्रिटनमध्ये नवीन प्रकारचा कोरोना विषाणू आढळून  आला आहे. आधीच्या कोरोना विषाणूपेक्षा  या विषाणूच्या प्रसाराचा वेगही अधिक असल्यामुळे जगभरात दहशत निर्माण झाली आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचे लसीकरण सुरू असतानाच हा नवीन कोरोना विषाणू आढळून आला असून तो नियंत्रणाबाहेर गेला आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये रविवारपासूनच कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे भारताचीही चिंता वाढली असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आजच तातडीची बैठक बोलावली आहे.

ब्रिटनमध्ये आढळून आलेला नवीन कोरोना विषाणू किती धोकादायक आहे, याचा अंदाज ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरिस जॉनसन यांनी व्यक्त केलेल्या चिंतेतून बांधला जाऊ शकतो. कोरोनाचा हा नवा विषाणू आधीच्या विषाणूपेक्षा ७० टक्के जास्त वेगाने फैलावतो. त्यामुळे तो आधीच्या विषाणूपेक्षा जास्त धोकादायक ठरू शकतो, असे जॉनसन यांनी म्हटले आहे. त्यामुळे कोरोना विषाणूवर लस येऊनही या नव्या विषाणूमुळे दहशत निर्माण झाली आहे. ही दहशत केवळ ब्रिटनमध्येच नव्हे तर भारतासह जगभर निर्माण झाली आहे.

हा धोका लक्षात घेऊन बहुतांश युरोपीय देशांनी ब्रिटनमधून येणाऱ्या सर्वा विमान उड्डाणांवर बंदी घातली आहे. युरोपशिवाय जगभरातील अनेक देशांनाही असाच निर्णय घेतला आहे. या धोक्याच्या पार्श्वभूमीवर भारतातही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आजच तातडीची बैठक बोलावली आहे.

या बैठकीत ब्रिटनमध्ये वेगाने फैलावत चाललेल्या नव्या प्रकारच्या कोरोना विषाणू संसर्गावर चर्चा केली जाईल. आरोग्यसेवा महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त निगरानी गटाची ही बैठक बोलावण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे भारतातील प्रतिनिधी डॉ. रॉडरिको एच. ऑफ्रिनही या बैठकीत सहभागी होऊ शकतात. तेही संयुक्त निगरानी गटाचे सदस्य आहेत.

अनेक देशांनी ब्रिटनहून येणाऱ्या विमान उड्डाणांवर प्रतिबंध घातले असताना भारतात ही तयारी सुरु करण्यात आली आहे. नेदरलँडने असे निर्बंध आधीच घातले आहेत. ब्रिटनसह नेदरलँड, डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलियातही हा नवीन प्रकारचा कोरोना विषाणू आढळून आल्याचे वृत्त जागतिक आरोग्य संघटनेच्या हवाल्याने बीबीसीने दिले आहे.

मागच्याच आठवड्यात ब्रिटनमध्ये नवीन प्रकारचा कोरोना विषाणू आढळून आल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले होते. इंग्लंडच्या दक्षिण भागात हा विषाणू आढळून आला असून त्याच्या फैलावाचा वेग अपेक्षापेक्षा जास्त आहे, असे ब्रिटनचे आरोग्य सचिव मॅट हँकॉक यांनी म्हटले होते. ब्रिटनमध्ये सध्या लसीकरण सुरू आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा