गडकरी मेहरबान?: डेडलाइन हुकवणाऱ्या अंबानींच्या कंपनीला एनएचएआय देणार २६० कोटींचे कर्ज

0
140
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः पुणे- बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण करण्याची डेडलाइन अनेकदा हुकवलेल्या आणि टोल वसुलीतून जमा झालेला पैसा म्युच्युअल फंडात गुंतवण्यासाठी वळवल्याचा आरोप असलेल्या अनिल अंबानींच्या पी.ए. टोल रोड प्रायव्हेट लिमिटेडला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) तब्बल २६० कोटी रुपयांचे कर्ज देऊ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झालेल्या  बैठकीत गेल्यावर्षी हा निर्णय घेण्यात आला आणि आता एनएचएआयच्या मुंबई कार्यालयाने हा प्रस्ताव दिल्लीतील मुख्यालयाकडे पाठवला आहे.

पी.एस. टोल रोड प्रायव्हेट लिमिटेड ही अनिल अंबानींच्या आर- इन्फ्रा लिमिटेडची सहायक कंपनी असून तीच घाटकोपर- अंधेरी मेट्रो चालवते. पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या १४० किलोमीटर भागाच्या रूंदीकरणाच्या कामाचे कंत्राट कंपनीला २०१० मध्ये देण्यात आले. तेव्हापासून कंपनी निर्धारित मुदतीत हे काम पूर्ण करू शकली नसल्यामुळे कंपनीला त्यासाठी पाच वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ३० महिन्यांची मूळ मुदत होती. नोव्हेंबर २०१४ मध्ये कंपनीला पहिली मुदतवाढ देऊन डिसेंबर २०१५ ची डेडलाइन देण्यात आली. या मुदतीत कंपनीला काम पूर्ण करता आले नाही. कंपनीला शेवटची मुदतवाढ मार्च २०१९ मध्ये देऊन जून २०१९ ची डेडलाइन देण्यात आली होती. मात्र जानेवारी २०१९ पर्यंत या प्रकल्पाचे केवळ ९३.६ टक्केच काम पूर्ण झाल्याचे स्वतः कंपनीनेच मान्य केले आहे. सवलत देऊनही दोन प्रकल्प टप्पे पूर्ण करण्यात कंपनी अपयशी ठरली तर तिसऱ्या टप्प्यात कंपनीने स्वतःची संसाधने वापरून प्रकल्प पूर्ण करावा, प्रकल्पाचा तिसरा टप्पा मुदतीत पूर्ण केल्यानंतरच निलंबलेख खात्यातून रक्कम काढण्याची परवानगी दिली जाईल, अशी अट या कंत्राटात आहे. मात्र या प्रकल्पाला वारंवार विलंब होऊनही एनएचएआयने पी. एस. टोल रोड प्रायव्हेट लिमिटेडविरुद्ध एकदाही कंत्राटातील या अटीचा वापर केलेला नाही. मुंबई मिररने हे वृत्त दिले आहे.

आम्ही एनएचएआयचे अधिकारी आणि आर-इन्फ्राविरुद्ध सीबीआयकडे आधीच तक्रार दाखल केली आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आर-इन्फ्राला २६० कोटी रुपयांचे कर्ज एनएचएआयने देऊ केल्याचे दस्तऐवज आमच्याकडे आहेत, ते घेऊन आम्ही पुन्हा एकदा सीबीआयकडे जाणार आहोत, असे वकील आणि सामाजिक कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा