सचिन वाझे यांना एनआयएकडून अटक, एनआयएच्या तत्परतेवरच शिवसेनेचे प्रश्नचिन्ह

0
102
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकासह आढळलेल्या स्कॉर्पिओ गाडी प्रकरणात एनआयएने सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक केली आहे. वाझे यांची शनिवारी सकाळपासून एनआयएकडून चौकशी सुरू होती. तब्बल १३ तास चाललेल्या चौकशीनंतर एनआयएने वाझे यांना अटक केली आहे. सचिन वाझे यांनीच अंबानीच्या घराजवळ स्फोटके असलेली गाडी उभी केली होती, असा आरोप एनआयएने केला आहे. तर एनआयएच्या तत्परतेवर शिवसेनेने प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून एनआयएला स्फोटकांचा तपास करायचा होता की वाझेंना अटक करून राजकीय हिशेब चुकता करायचा होता, असा सवाल शिवसेनेने केला आहे.

सचिन वाझे यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. तो फेटाळून लावण्यात आल्यानंतर एनआयएने वाझे यांना अटक केली. एनआयएने शनिवारी सकाळपासून वाझे यांची चौकशी सुरू केली होती. अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांसह आढळलेली स्कॉर्पिओ मनसुख हिरेन यांच्या ताब्यात होती. त्यामुळे मनसुख हिरेन यांचा मृत्यू आणि त्यांच्या कारची चोरी ही प्रकरणे एकाच गुन्ह्याचे दोन पैलू असल्याची शंका एनआयएला होती. दोन दिवसांपूर्वी एनआयएने हिरेन कुटुंबाकडून माहिती घेतली. हिरेन कुटुंबाने दिलेल्या माहितीच्या आधारे एनआयएने सचिन वाझे यांची चौकशी केली. १३ तास चाललेल्या चौकशीनंतर एनआयएने त्यांना अटक केली.

अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके असलेली स्कॉर्पिओ उभी करण्यात सचिन वाझे यांचा सहभाग असल्याचा आरोप एनआयएने केला आहे. याच आरोपाखाली वाझे यांना एनआयएने अटक केली आहे.

मनसुख हिरेन मृत्युप्रकरणात एटीएसकडून आपल्याला अटक होऊ शकते, अशी भीती असल्यामुळे सचिन वाझे यांनी ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर निकाल लागेपर्यंत अटक केली जाऊ नये, अशी त्यांची मागणी होती. मात्र हे प्रकरण गंभीर असल्यामुळे सचिन वाझे यांना अटक करून कोठडीत चौकशी करणे आवश्यक आहे, असा युक्तिवाद एटीएसने केला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर वाझे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता.

राजकीय हिशेब चुकता?:  वाझे यांच्या अटकेनंतर राजकीय आरोपप्रत्यारोप सुरू झाले आहेत. एनआयएला दहशतवादाचा तपास करायचा होता की सचिन वाझे यांना तुरूंगात टाकून राजकीय हिशेब चुकता करायचा होता, असा सवाल शिवसेनेने केला आहे. मुंबई पोलिसांची क्षमता जगाला माहीत आहे. मनसुख प्रकरणात एनआयएचा प्रवेश हा त्या क्षमतेवर हल्ला आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी या प्रकरणाचा तपास एटीएसकडे दिला होता. एटीएसने आतापर्यंत मुंबई, महाराष्ट्रच नव्हे तर देशातील अनेक प्रकरणांचा तपास केला आहे. अनेक गुन्हेगारांना फासावर लटकवले आहे. मुंबई बॉम्बस्फोटांचा तपास केला आहे. २६/११ चा हल्ला परतवून लावला आहे. असे असताना जिलेटिनच्या कांड्यासाठी एनआयएचे पथक ज्या पद्धतीने मुंबईत आले आणि तपास केला ते आश्चर्यकारक आहे, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. केंद्राचा दबाव आणि दहशत आहे, हे दाखवण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे राऊत म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा