एल्गार परिषद प्रकरणी एनआयएने दाखल केले 11 जणांवर नव्याने गुन्हे, देशद्रोहाचे कलम मात्र गायब

0
270
संग्रहित छायाचित्र.

पुणेः पुण्यातील बहुचर्चित एल्गार परिषद प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने ( एनआयए) 11 जणांविरूद्ध नव्याने गुन्हे दाखल केले आहेत. एनआयएने गुन्हे दाखल केलेल्या 11 जणांपैकी 9 जण सध्या तुरूंगात आहेत.या सर्व संशयितांविरुद्ध  दहशववादविरोधी कायद्यांतर्गत ( यूएपीए) आणि भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र एनआयएने नोंदवलेल्या या प्रथम चौकशी अहवालातून ( एफआयआर) देशद्रोहाचे कलमच गायब करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या सरकारने एल्गार परिषद आणि कोरेगाव-भीमा दंगल प्रकरणी नव्याने चौकशी सुरू करण्याच्या हालचाली करताच केंद्रातील मोदी सरकारने या प्रकरणाचा तपास परस्पर एनआयएकडे सोपवला. एल्गार परिषद प्रकरणाचा तपास एनआयएकडे वर्ग करण्याच्या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी झाली. हे प्रकरण तपासासाठी आपल्याकडे सोपवण्यात यावे, अशी विनंती एनआयएने न्यायालयाला केली. त्यावर न्यायालय 6 फेब्रुवारी रोजी निर्णय देणार आहे. हा निर्णय येण्याआधीच एनआयएने एल्गार परिषद प्रकरणी 11 जणांविरोधात नव्याने गुन्हे दाखल केले आहेत.मात्र या एफआयआरमध्ये देशद्रोहाचे भादंविचे कलम 124 ए लावण्यात आलेले नाही. एल्गार परिषद प्रकरणी सुधा भारद्वाज, शोमा सेन, वरवरा राव, सुरेंद्र गडलिंग, अरूण परेरा, व्हर्नन गोन्सालवीस आणि महेश राऊत हे नऊ जण अद्यापही तुरूंगात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या या कारवाईवर आक्षेप घेत बुद्धीवादी व विचारवंतांना अर्बन नक्षलवादी ठरवून तुरूंगात डांबण्याचे षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली होती. मात्र मोदी सरकारने या प्रकरणाचा तपास परस्पर एनआयएकडे सोपवल्याने आरोप-प्रत्यारोपाच्या जोरदार फैरी झडल्या होत्या.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा