शेतकरी आंदोलनः ४० नेते, समर्थकांना एनआयएच्या नोटिसा; दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न?

0
94
प्रातिनिधिक छायाचित्र.

नवी दिल्लीः मोदी सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर गेल्या ५२ दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. अशातच पंजाबचे शेतकरी नेते आणि शेतकरी आंदोलनाच्या समर्थकांना एनआयकडून समन्स बजावण्यात आले आहेत. हे समन्स शेतकऱ्यांना भीती दाखवण्यासाठी बजावले जात आहेत का? असा सवाल केला जात असून एकेकाळी भाजपच्या नेतृत्वातील एनडीएचा घटकपक्ष राहिलेल्या शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीरसिंग बादल यांनी शेतकऱ्यांना घाबरवण्यासाठीच एनआयएचा वापर केला जात असल्याचा आरोप केला आहे.

 देशात कृषी कायद्याविरोधात आंदोलन सुरु असतानाच पंजाबचे शेतकरी नेते बलदेवसिंग सिरसा, शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिलेले अभिनेते दीप सिद्धू यांच्यासह ४० लोकांना राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एनआयएने समन्स बजावले आहे. दहशतवादविरोधी कारवायांचा तपास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या एनआयएने दीप सिद्धू यांना आज सकाळी १० वाजता एनआयए कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. शीख फॉर जस्टिस म्हणजेच एसएफजे या बंदी घातलेल्या संघटनेशी संबंधित प्रकरणात चौकशीसाठी त्यांना समन्स पाठवण्यात आले आहे.

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारे आडते, पंजाबी गायक आणि शेतकरी नेत्यांवर प्राप्तिकर विभागाने छापेमारी केली होती. त्यावेळी आंदोलक शेतकऱ्यांवर दबाव आणण्यासाठी मोदी सरकारने छापेमारी केल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला होता. आता एनआयएने भलाई इन्साफ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष बलदेवसिंग सिरसा यांना समन्स बजावले आहे. सिरसा हे शेतकरी आंदोलनात सक्रीय आहेत.

सिरसा एनआयएच्या नवी दिल्लीतील मुख्यालयात रविवारीच हजर राहण्यास सांगण्यात आले. शीख फॉर जस्टिसचे संयोजक गुरपतवंतसिंग पन्नूविरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात सिरसा यांना हे समन्स बजावण्यात आले आहे.

पंजाबी अभिनेता दीप सिद्धूने एनआयएने समन्स बजावल्याची माहिती फेसबुकवर दिली. त्यांनी एनआयएचे हे समन्स शेअरही केले आहे. असे प्रतीत होते की, तुम्ही (दीप सिद्धू) खाली नमूद करण्यात आलेली तथ्ये आणि परिस्थितीशी परिचित आहात. त्याचा मी तपास करत आहे….तुम्हाला या प्रकरणाशी संबंधित काही प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी १७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता राष्ट्रीय तपास संस्था, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली येथे हजर रहावे लागेल, असे एनआयएचे पोलिस निरीक्षक धीरज कुमार यांनी या समन्समध्ये म्हटले आहे.

शेतकरी आंदोलनातील नेते आणि समर्थकांना एनआयएकडून समन्स बजावण्यात आल्याचे उघड झाल्यानंतर शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीरसिंग बादल यांनी तीव्र निषेध केला आहे. शेतकरी नेते आणि शेतकरी आंदोलनाच्या समर्थकांना एनआयए आणि ईडीकडून चौकशीसाठी बोलावणे म्हणजेच केंद्र सरकारचा धमकावण्याचा, भीती घालण्याचा प्रयत्न आहे. त्याचा मी तीव्र निषेध करतो. ते देशद्रोही नाहीत. चर्चेची नववी फेरी निष्फळ ठरल्यानंतर भारत सरकार शेतकऱ्यांना केवळ परेशान करण्याचा प्रयत्न करत आहे, हे स्पष्ट आहे, असेही बादल यांनी म्हटले आहे.

 केंद्र सरकार शेतकरी आंदोलनाला पटरीवरून उतरवण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारने आधी सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून असे करण्याचा प्रयत्न केला. आता एनआयएचा वापर केला जात आहे, असे सिरसा यांनी म्हटले आहे.

शेतकरी आंदोलनाशी संबंधित अनेक लोकांना असे समन्स बजावण्यात आले आहे. हा शेतकऱ्यांत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. आमच्यावर यामुळे कोणताही फरक पडणार नाही. आम्ही झुकणार नाही. २६ जानेवारीला होणारी शेतकरी ट्रॅक्टर परेड होऊ नये म्हणून एनआयए रात्रंदिवस प्रयत्न करत आहे, असेही सिरसा म्हणाले.

विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच केंद्र सरकारच्या वतीने हजर झालेले ऍटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांनी दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनात खलिस्तान्यांनी घुसखोरी केली असल्याचे सरकारला कळले आहे, असे न्यायालयाला सांगितले होते.

एनआयएने शीख फॉर जस्टिसविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरमध्ये या संघटनेबरोबर अन्य काही खलिस्तान समर्थक संघटनांवर कट रचल्याचा आरोप ठेवला आहे. भारत सरकारविरुद्ध मोहीम चालवण्यासाठी परदेशातून मोठ्या प्रमाणावर पैसा गोळा करण्यात आला आहे. अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, जर्मनीसह अनेक देशातील भारतीय दूतावासाबाहेर निदर्शने केली जात आहेत, असे एफआयआरमध्ये म्हटले आहे.

मोदी सरकार आपले राजकीय विरोधक आणि त्यांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांची तोंडे बंद करण्यासाठी देशातील प्रतिष्ठित तपास संस्थांचा वापर करते, असे आरोप वारंवार होत आले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा