रात्रीच्या संचारबंदीची अंमलबजावणी सुरूः हॉटेल, ढाब्यांचे रात्री साडेदहा वाजताच होणार शटरडाऊन

0
203
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका क्षेत्रात रात्रीच्या संचारबंदीची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा रुग्णालये, औषधी, कंपनी, बससेवा सोडल्यास सर्व काही बंद राहणार आहे. शहरातील हॉटेल, ढाबे रात्री साडेदहा वाजताच बंद केले जाणार आहेत. संचारबंदीच्या कठोर अंमलबजावणीसाठी पोलिसांकडून अचानक नाकाबंदी व शहरातील काही भागात तपासणी केली जाणार आहे.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त निखील गुप्ता, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेत माहिती दिली. संचारबंदी लागू करण्यात आली असली तरी जनजीवन सुरळित राहिले पाहिजे याची खबरदारी घेतली जाणार आहे. शहरवासियांनीही सतर्क असणे गरजेचे आहे. दरम्यान रात्रीच्या संचारबंदीत रुग्णालये, औषधी दुकाने, पेट्रोलपंप, रीक्षा सेवा, बससेवा, औद्योगिक क्षेत्रातील कारखाने सुरु राहणार आहेत, असे जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले.

 रात्री ११ वाजेनंतर बाहेरगावाहून आलेले प्रवासी, कंपनीतून ड्युटी करुन आलेले किंवा जाणारे कामगार-कर्मचाऱ्यांना पोलिसांना ओळखपत्र दाखवावे लागणार आहे. हॉटेल, ढाब्यावर रात्री मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी टाळण्यासाठी रात्री साडेदहा वाजता हॉटेल, ढाबे बंद केले जाणार आहेत. संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी अचानक नाकाबंदी तसेच काही भागात अचानक तपासणी केली जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी दिली. ग्रामीण भागात अद्याप रात्रीची संचारबंदी लागू केलेली नाही. परिस्थिती पाहून तसा निर्णय घेतला जाईल, असे पाटील म्हणाल्या.

लग्न समारंभातील गर्दीवरही नजरः गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने लग्न सभारंभात केवळ ५० व्यक्तींनाच परवानगी दिलेली असतांना अनेक विवाह समारंभात ५० पेक्षा जास्त जण उपस्थित असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन होत असेल तर या संदर्भात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिला. सध्या जिल्ह्यात ५८० कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे कोरोनामुक्तीकडे वाटचाल होत असलेल्या जिल्ह्यातील वातावरण चांगले राहण्यासाठी सर्वांनीच सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

रिकाम टेकड्यांविरुद्ध थेट दाखल होणार गुन्हाः रात्री ११ ते सकाळी ६ या संचारबंदी काळात अत्यावश्यक कामे वगळता विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर पोलीस कायदेशीर कारवाई करतील. मेडिकल, ट्रान्सपोर्ट व अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये. शहरात १७ पोलीस ठाण्याअंतर्गत पेट्रोलिंग करणाऱ्या टीमद्वारेच शहरात संचारबंदीवर नजर ठेवली जाईल. गरज पडल्यास यात वाढही करण्यात येईल. मात्र नागरिकांनी स्वयंशिस्त लावून घराबाहेर पडू नये आणि पोलिसांवर कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नये. गरज पडल्यास दोषींवर गुन्हा दाखल होऊन अटकही होऊ शकते, असे पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा