पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणूकः मतदार ओळखपत्राखेरीज ही ९ कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य

0
96
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः येत्या १ डिसेंबर रोजी होत असलेल्या विधानपरिषदेच्या द्विवार्षिक पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटवण्यासाठी जे मतदार ओळखपत्र सादर करु शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटवण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त नऊ पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत.

मतदार ओळखपत्राखेरीज ग्राह्य धरल्या जाणाऱ्या पुराव्यात १) आधार कार्ड २) वाहन चालक परवाना ३) पॅन कार्ड ४) पारपत्र ५) केंद्रराज्य शासन सार्वजनिक उपक्रमस्थानिक स्वराज संस्था किंवा खाजगी औद्योगिक घराणे यांनी वितरित केलेले सेवा ओळखपत्र ६) खासदार-आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र ७) संबंधित पदवीधर-शिक्षक मतदार संघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या पदवीधर-शिक्षक मतदारांना वितरित केलेले सेवा ओळखपत्र ८) विद्यापीठाद्वारे वितरित मूळ पदवी-पदविका प्रमाणपत्र ९) सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरित केलेले अपंगत्वाचे मूळ प्रमाणपत्र या कागदपत्रांचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबतचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

 छायाचित्रासह मतदार ओळखपत्रान्वये मतदाराची ओळख पटत असेल तर मतदार ओळखपत्रातील किरकोळ विसंगती दुर्लक्षित करण्यात याव्यात. तसेच छायाचित्रासह मतदार ओळखपत्रातील विसंगत छायाचित्रामुळे मतदाराची ओळख पटणे/पटवणे शक्य नसल्यास मतदारास उपरोक्त पर्यायी कागदपत्रांपैकी एक ओळख कागदपत्र सादर करणे आवश्यक राहील. मतदार ओळखपत्र व पर्यायी ओळखपत्र याबाबत काही संभ्रम असल्यास भारत निवडणूक आयोगाचे १० नोव्हेंबरचे मूळ आदेश अंतिम राहतील, असे सामान्य प्रशासन विभागाचे उप आयुक्त तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कळवले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा