रायगड जिल्ह्यातील अलिबागेत धडकले निसर्ग चक्रीवादळ, पुढचे तीन तास अत्यंत कसोटीचे!

0
220

मुंबईः अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेले निसर्ग चक्रीवादळ रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीच्या भागात धडकले. आज दुपारी एक वाजेच्या सुमारास या चक्रीवादळाने जमिनीला स्पर्श केला. मुंबईसह महाराष्ट्राच्या चार जिल्ह्यात पुढील तीन तास अत्यंत कसोटीचे ठरणार आहेत.

रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये जमिनीला स्पर्श करत धडकलेल्या या चक्रीवादळाचा प्रकोप पुढील तीन तास मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यात जाणवणार आहे. हे चक्रीवादळ धडकल्याबरोबर वाऱ्याचा वेग प्रचंड वाढला असून सध्या ताशी १२० ते १४० किलोमीटर वेगाने वारे वहात आहेत. या चक्रीवादळाच्या प्रकोपाचे परिणाम पुणे आणि नाशिक जिल्ह्यातही जाणवणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी घरातच सुरक्षित रहावे, असे आवाहन प्रशासनातर्फे नागरिकांना करण्यात आले आहे.

चक्रीवादळात ही घ्या काळजीः

  • ग्रामीण शहरी भागात ज्या वस्तू आपल्या आजूबाजूला अशाच मोकळ्या किंवा सैल स्वरूपात ठेवण्यात आल्या असतील त्या घरात आणा किंवा बांधून ठेवा. जेणेकरून वादळातील वाऱ्याने त्या उडून जाऊन कुणालाही इजा होणार नाही.
  • मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे पूरस्थिती उद्भवलीच तर काही ठिकाणी वीजप्रवाह बंद होईल किंवा खबरदारीचा उपाय म्हणून वीजपुरवठा बंद करावा लागेल. त्यामुळे अशा परिस्थितीसाठी सज्ज रहा., पिण्याचे पाणी भरून ठेवा.
  • वादळाच्या काळात वीजेची उपकरणे वापरू नका. ज्या अनावश्यक गोष्टी असतील त्या बांधून ठेवा. अत्यावश्यक गोष्टींची सुसूत्रता ठेऊन त्या जवळपास ठेवा. मोबाइल चार्ज करून ठेवा. फोन, संवादाची उपकरणे सज्ज ठेवा. औषधे जवळपास ठेवा.
  • महत्वाचे दस्तऐवज एकत्र ठेवा. कोणत्याही अफवा पसरवू नका आणि अफवांवर विश्वास ठेऊ नका.दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सूचना ऐका, पाळा.
  • धोक्याच्या क्षेत्रातील नागरिकांना प्रशासन सुरक्षितस्थळी नेत आहे. त्यांना नागरिकांनी सहकार्य करा. ते सांगत असलेल्या सुरक्षितस्थळी वेळेत जा.
  • ग्रामीण आणि शहरी भागात जर घर कच्चे असेल तर सुरक्षित जागा शोधून ठेवा. तात्पुरत्या बांधलेल्या शेडमध्ये आधाराला अजिबात जाऊ नका.
  • शेड, मोडकळीला आलेल्या इमारती याचा अजिबात आश्रय घ्यायचा नाही. कुठे वायुगळती झाली असेल किंवा केमिकल जर कुठे पडले असेल तर तिकडे काय होतेय हे पहायला अजिबात जाऊ नका
  • स्वत: सुरक्षित राहून जिथे मदत करता येणे शक्य आहे तिथे मदत करावी. यातून आपण होणारे नुकसान थोपवता येणे शक्य होईल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा