पुढील तीन तासांत मुंबई, ठाण्यात धडकणार निसर्ग चक्रीवादळ, इतिहासात मुंबईत पहिल्यांदाच धडक!

0
86

मुंबईः अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेले निसर्ग चक्रीवादळ रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये धडकले असून पुढील तीन तासांत ते मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात धडकणार असल्याचे भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे. विशेष म्हणजे आजवर थेट मुंबईत कधीही चक्रीवादळ धडकलेले नाही.

रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये जमिनीला स्पर्श करत धडकलेल्या या चक्रीवादळाचा प्रकोप पुढील तीन तास मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यात जाणवणार आहे. हे चक्रीवादळ धडकल्याबरोबर वाऱ्याचा वेग प्रचंड वाढला असून सध्या ताशी १०० ते ११० किलोमीटर वेगाने वारे वहात आहेत. हे चक्रीवादळ पुढील तीन तासांत मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात धडकणार आहे, असे भारतीय हवामान खात्याने ( आयएमडी) म्हटले आहे.

हेही वाचाः रायगड जिल्ह्यातील अलिबागेत धडकले निसर्ग चक्रीवादळ, पुढचे तीन तास अत्यंत कसोटीचे!

 या चक्रीवादळाच्या प्रकोपाचे परिणाम पुणे आणि नाशिक जिल्ह्यातही जाणवणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी घरातच सुरक्षित रहावे, असे आवाहन प्रशासनातर्फे नागरिकांना करण्यात आले आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील थळ येथे सुमारे १ हजार ५०० लोकांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली आहे.

एनडीआरएफची २१ पथके तैनातः मुंबईत गिरगाव, वर्सोवा, दादर, जुहू, आक्सा आणि गोराई या मुंबीतील सहा प्रमुख चौपाट्या आहेत. या सहाही चौपाट्यांवर अग्निशमन दलाने ९३ जीवरक्षक आणि १५० पूर नियंत्रक टीमच्या सदस्यांना तैनात ठेवले आहे. या सहाही चौपाट्यांवर बोटींसह नैसर्गिक संकटापासून बचावासाठीच्या सर्व गोष्टी तैनात केल्या आहेत. एनडीआरएफच्या २१ टीम सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. मुंबईत ३, ठाण्यात १, रायगडमध्ये २, रत्नागिरीत १ आणि सिंधुदुर्गात १ अशी पथके तैनात केली आली असून ६ पथके राखीव ठेवण्यात आली आहेत. आतापर्यंत एक लाख लोकांना सुरक्षित स्थळी हवलण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा