मुंबईसाठी पुढील अडीचतास अत्यंत महत्वाचे; निसर्ग चक्रीवादळाचा रायगड, रत्नागिरीत प्रकोप सुरू

0
142

मुंबईः अलिबागेत जमिनीला स्पर्श करून धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात प्रकोप सुरू झाला असून अनेक ठिकाणी घरावरील पत्रे उडाली आहेत तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. पुढील अडीच तासांत हे चक्रीवादळ मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात धडकणार असून हे अडीच तास मुंबईच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आणि कसोटीचे ठरणार आहेत.

अलिबागेत धडकून निसर्ग चक्रीवादळाने आपला मोर्चा मुंबई आणि ठाणे जिल्ह्याकडे वळवला आहे. ताशी १२० किलोमीटर वेगाने वारे वाहू लागले आहेत. समुद्रात उंचच ऊंच लाटा उठत आहेत. दापोली येथे काही घरांवरील पत्रे उडून गेली आहेत. मात्र कोणतीही जिवित हानी झालेली नाही. रायगड- रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्यामुळे वाहतूक बंद पडली आहे.

आंबाघाटात एक मोठे झाड कोसळल्यामुळे वाहतूक थांबली होती. आता एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. गुहागर-खेड मार्ग मात्र वाहतुकीसाठी बंद आहे. रायगड- रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे.पांढरा समुद्र भागात एका सिमेंट कंपनीची बोट वादळात भरकटली आहे. समुद्रात टाकलेला नांगर निघाल्यामुळे ही भरकटल्याचे सांगण्यात येते.

पश्चिम किनारपट्टीवर आता पासून अडीच तासांनी येऊन धडकणाऱ्या निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाची आपत्कालीन यंत्रणा सज्ज आहे.परिस्थिती हाताळण्यासाठी आयसीजी, एसएसएफ आणि एनडीआरफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या असून आवश्यक त्या सर्व उपाययोजना प्रशासन करत आहे. नागरिकांनीही सतर्क रहावे, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा