चिंता करू नका, महाराष्ट्रात बर्ड फ्लू नाहीः बिनधास्त खा अंडी, चिकन!

0
240
संग्रहित छायाचित्र.

मुंबई महाराष्‍ट्रातील विविध जिल्‍हयांतील वन्य व स्थलांतरीत पक्षांचे रक्‍त आदी नमुन्यांची चाचणी करण्यात आली असून त्‍यात बर्ड फ्लूची कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत. तसेच या रोगामुळे मृत्यू झाल्याचे दिसून आलेले नाही. त्‍यामुळे पोल्‍ट्री व्यावसायिक तसेच अंडी व मांस खाणाऱ्यांना घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही,  असा दिलासा पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांनी दिला आहे.

कोरोनानंतर देशाच्या अनेक भागात बर्ड फ्लूने दहशत माजवली आहे. मध्य प्रदेश,  राजस्थान,  केरळ व हिमाचल प्रदेशात बर्ड फ्लूचा फैलाव झाल्याने महाराष्ट्रातही भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यापार्श्वभूमिवर पशूसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांनी दिलासा दिला आहे. पशुसंवर्धन विभागाद्वारे दरवर्षी बर्ड फ्लू सर्वेक्षण कार्यक्रम राबविण्यात येतो.

या कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यांमधून पक्षांच्या घशातील द्रवांचे नमूने, विष्ठेचे नमूने तसेच रक्तजल नमूने तपासणीसाठी गोळा करण्यात येतात. यांची तपासणी पश्चिम विभागीय रोगनिदान प्रयोगशाळा, पुणे या ५ राज्यांसाठी पशुरोग निदानाच्या शिर्षस्थ प्रयोगशाळेमध्ये तपासण्यात येतात. यावर्षी राज्यातील एकूण १७१५ विष्ठा नमूने, १९१३ रक्तजल नमुने १५४९ घशातील द्रवांचे नमुन्यांची तपासणी  केलेली आहे. तपासणीअंती वरील सर्व नमूने बर्ड फ्लू रोगासाठी नकारार्थी आढळून आले आहे, असे केदार यांनी सांगितले.

स्थलांतरित होणारे जंगली पक्षी, कावळे, परसातील कोंबडयांमध्ये आणि व्यावसायिक स्तरावर कुक्कुट पालन करणाऱ्या ठिकाणावर बर्ड फ्लू रोगाचे सर्वेक्षण अधिक प्रखरपणे राबविण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना पशुसंवर्धन आयुक्तालयाद्वारे निर्गमीत करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्यात अद्यापपावेतो वन्य व स्थलांतरित पक्षी, कावळे अथवा कोबडयांत बर्ड फ्लू रोगाचा संसर्ग आढळून आलेला नाही अथवा या रोगामुळे मृत्यू झाल्याचेही दिसून आलेले नाही. त्यामुळे कुक्कुट पालक, अंडी व मांस खाणाऱ्या मांसाहारी नागरिकांनी अकारण घाबरण्याची परिस्थिती नाही, असे केदार म्हणाले.

…तर जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधाः स्थलांतरित होणारे जंगली पक्षी, कावळे, परसातील कोंबडया आणि व्यावसायिक स्तरावर कुक्कुट पालन होणाऱ्या ठिकाणावर असाधारण स्वरुपाचा मृत्यू आढळून आल्यास त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधण्यात यावा, असे आवाहन केदार यांनी केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा