आता रेणू शर्मा म्हणतेः माझ्याकडे धनंजय मुंडेंचे ना आक्षेपार्ह फोटो, ना व्हिडीओ!

0
1447
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या गायिका रेणू शर्मा यांनी अखेर मुंडेंविरोधात दिलेली तक्रार मागे घेतली आहे. त्यामुळे या प्रकरणातील आता हवाच निघून गेली असून धनंजय मुंडेंवरील मोठे बालंटही टळले आहे. रेणू शर्माने मुंडेंच्या विरोधातील तक्रार मागे घेतल्यानंतर एक निवेदन जारी केले आहे. त्यात तिने माझ्याकडे धनंजय मुंडे यांचे आक्षेपार्ह फोटो किंवा व्हिडीओ नाहीत, असेही स्पष्ट केले आहे.

धनंजय मुंडे यांनी आपल्यावर बलात्कार केला, लैंगिक शोषण केले आणि लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केली, असा आरोप करून रेणू शर्माने खळबळ उडवून दिली होती. रेणू शर्माच्या आरोपामुळे महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले होते. भाजपने मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याचीही मागणी केली होती आणि रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता. मात्र रेणू शर्माने मुंडेंविरोधातील तक्रारच मागे घेतल्यामुळे या प्रकरणातील हवाच निघून गेली असून भाजप नेते चांगलेच तोंडघशी पडले आहेत.

हेही वाचाः शेतकरी आंदोलनातील चार शेतकरी नेत्यांना गोळ्या घालून ठार मारण्याचा कट

मुंडेंविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतल्यानंतर रेणू शर्माने सोशल मीडियावर एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात रेणू शर्मा म्हणते की, मी धनंजय मुंडे यांच्या विरोधात लग्नाचे आमिष आणि बलात्काराचा जो आरोप केला होता, त्याबाबत माझे खालील प्रमाणे निवेदन आहे-

”मी स्पष्ट करू इच्छिते की, माझी बहीण आणि धनंजय मुंडे यांच्यात काही काळापासून दुरावा निर्माण झाला आणि न्यायालयात खटला चालू झाल्यापासून मी मानसिक तणाव आणि दबावात होते. परंतु विरोध पक्ष त्यांच्या विरोधात जात असल्याचे पाहून मला वाटले की, मी एखाद्या मोठ्या राजकीय षडयंत्राची शिकार होत आहे आणि काही लोक माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या चालवत आहेत. हे सर्व चुकीचे आहे. मला माझ्या घरातील कोणत्याही व्यक्तीचे नाव खराब करायचे नाही. शेवटी मी इतकेच सांगू इच्छिते की, मी धनंजय मुंडे यांच्या विरोधात दाखल केलेली तक्रार पूर्णतः मागे घेत आहे.

मी त्यांच्या विरोधात अशा कोणत्याही तक्रारीचा पाठपुरावा करू इच्छित नाही. रेकॉर्डसाठी मी स्पष्ट करू इच्छिते की, माझी लग्नाचे आमिष दाखवल्याची आणि बलात्कार केल्याची कोणतीही तक्रार नाही आणि माझ्याकडे त्यांच्यासोबतचा कोणताही आक्षेपार्ह फोटो किंवा व्हिडीओही नाही. हे निवेदन मी पूर्णतः सजगपणे देत आहे,” असे रेणू शर्माने निवेदनात म्हटले आहे.

विशेष म्हणजे जेव्हा रेणू शर्माने धनंजय मुंडे यांच्याविरोधात पोलिसांत बलात्कार आणि लैंगिक शोषणाची तक्रार दिली होती, तेव्हा मुंडेंनी रेणू शर्मा आपल्याला ब्लॅकमेल करण्यासाठी हे सर्व करत असल्याचे म्हटले होते. त्याचे खंडण करताना रेणू शर्माने माझ्याकडे असलेले फोटोज आणि व्हिडीओ बाहेर आल्यानंतर सर्वांची तोंडे बंद होतील, असे म्हटले होते. त्याच रेणू शर्मा आता आपल्याकडे कोणताही आक्षेपार्ह फोटो किंवा व्हिडीओ नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा