फडणवीस सरकारच्या काळातील 66 हजार कोटींच्या कामांचा ताळमेळच लागेना: कॅगचे ताशेरे

0
160
संग्रहित छायाचित्र .

मुंबईः देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारच्या राजवटीत 2018 पर्यंत झालेल्या तब्बल 66 हजार कोटी रुपयांच्या कामांचा ताळमेळच बसत नसल्याचे ताशेरे नियंत्रक आणि महालेखापालाच्या (कॅग) अहवालात ओढण्यात आले आहेत. या कामांची उपयोगिता प्रमाणपत्रेच सादर करण्यात आलेली नसल्याचे कॅगने म्हटले आहे.

एखादे काम पूर्ण झाल्यानंतर ते योग्यरित्या झाले की नाही, याबाबतची उपयोगिता प्रमाणपत्रे ते काम पूर्ण झाल्यानंतर 12 महिन्यांच्या आत सादर करणे नियमांनुसार बंधनकारक असते. परंतु फडणवीस सरकारच्या राजवटीत 2018 पर्यंत करण्यात आलेल्या तब्बल 65 हजार 921 कोटी रुपयांच्या विविध कामांची 32 हजाराहून अधिक उपयोगिता प्रमाणपत्रेच सादर केलेली नाहीत, असे कॅगने म्हटले आहे.

 केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपचे सरकार असल्यामुळे महाराष्ट्राला सर्वाधिक निधी मिळाला, असा दावा मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार केला आहे. मात्र कॅगचा अहवाल याच्या नेमके उलट सांगतो. फडणवीस सरकारच्या काळात केंद्र सरकारकडून येणार्‍या अनुदानात घट झाली. 2017 मध्ये  केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला 11 टक्के अनुदान देण्यात आले होते. 2018 मध्ये त्यात घट होऊन ते केवळ 9 टक्क्यांवर आल्याचे कॅगच्या अहवालात महटले आहे.

2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात भाजपचे सरकार आले होते. कॅगने या सरकारच्या कारकिर्दीतील कामाचा लेखाजोखाच आपल्या अहवालात मांडला असून फडणवीस सरकारवर ठपका ठेवला आहे. फडणवीस सरकारच्या राजवटीतील तब्बल 66 हजार कोटी रुपयांच्या कामांचा ताळमेळच लागत नसल्याचे खुद्द कॅगनेच म्हटल्यामुळे या सरकारने किती पारदर्शकपणे काम केले, याबाबत शंका घेऊन सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडूनही भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा