शिवसेनेला पाठिंबा किंवा सरकार स्थापनेबाबत चर्चाच नाहीः पवारांच्या गुगलीने सारेच बुचकळ्यात!

0
141
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही? सरकार स्थापन करायचे की नाही? या मुद्यांवर काँग्रेसच्या हंगामी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चाच झाली नाही, अशी गुगली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टाकल्यामुळे सगळेच जण बुचकळ्यात पडले असून पवारांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील सत्तास्थापनेचा सस्पेन्सही आणखीच वाढला आहे.

 रविवारी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक झाली. सोमवारी शरद पवार दिल्लीला जाऊन काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करतील. नंतर महाराष्ट्रातील काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकत्र बसून सरकार स्थापनेबाबत निर्णय घेतील, असे या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले होते. त्यानुसार शरद पवार यांनी आज दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेऊन सुमारे 50 मिनिटे चर्चा केली. या भेटीला जाण्यापूर्वी पवारांनी महाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबत शिवसेना- भाजपलाच विचारा, असे सांगून सस्पेन्स वाढवला होता. सोनिया गांधींच्या भेटीनंतर शिवसेनेला पाठिंबा किंवा सरकार स्थापनेबाबत चर्चाच झाली नाही, असे बैठकीनंतर सांगून पवारांनी त्यात आणखीच भर घातली आहे.

काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी करायची की नाही, याबाबत सोनिया गांधी यांच्याशी चर्चा झाली नाही. फक्त महाराष्ट्रातील सत्तापेचाची माहिती सोनिया गांधींना दिली. सोनिया गांधींनी पाठिंबा देणारे आमदार आणि दोन्ही पक्षांचे आमदार यांची संख्या जाणून घेतली. महाराष्ट्रातील राजकी परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला. महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी किमान समान कार्यक्रम तयार करण्याबाबत आम्ही बोललोच नव्हतो. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या समन्वय समितीची बैठकही होणार नाही. परंतु कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आम्ही आमच्या मित्रपक्षांना विश्वासात घेऊ, असे सांगत शिवसेना- भाजप एकत्र येणार की नाही, हे आम्ही कसे सांगणार?असा सवालही पवारांनी केला. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबतचा सस्पेन्स आणखीच वाढला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा