आर्यन खानकडे ड्रग्ज नव्हतेचः एनसीबीच्याच एसआयटीच्या अहवालात धक्कादायक खुलासा

0
107
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः कार्डिलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवर प्रचंड गाजावाजा करून एनसीबीने अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानवर केलेली कारवाई फुसकी निघाली आहे. आर्यन खानकडे त्यावेळी ड्रग्ज सापडलेच नव्हते, असा खुलासा एनसीबीनेच स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) दिलेल्या अहवालात करण्यात आला आहे. त्यामुळे एनसीबीचे मुंबई विभागाचे तत्कालीन संचालक समीर वानखेडे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात कार्डिलिया क्रूझवरील पार्टीवर कारवाई करण्यात आली तेव्हा एनसीबीने अनेक धक्कादायक दावे केले होते. या पार्टीत आलेले ड्रग्ज आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटकडून आले होते आणि आर्यन खान या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा भाग आहे, असा दावाही एनसीबीने केला होता. या प्रकरणावरून मोठे वादंग माजले होते. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एनसीबीने एसआयटीची स्थापना केली होती.

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्हः  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरती घोटाळ्यातील एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट वाचा एका क्लिकवर, वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कार्डिलिया क्रूझवर कारवाई करण्यात आली तेव्हा नियमाप्रमाणे या कारवाईचे व्हिडीओ चित्रिकरण करण्यात आले नव्हते. या गुन्ह्यात अटक केलेल्या अनेक आरोपींकडून जप्त करण्यात आलेले ड्रग्ज सिंगल रिकव्हरी म्हणून दाखवले आहे, असे एसआयटीने दिलेल्या चौकशी अहवालात म्हटले आहे.

 आर्यन खानकडे ड्रग्ज नव्हते आणि त्याचा कोणत्याही आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटशी संबंध नव्हता. अरबाज मर्चंटकडे सापडलेले ड्रग्ज व्यावसायिक वापराच्या प्रमाणापेक्षा कमी होते आणि ते आर्यन खानसाठीच आणण्यात आले होते, हेही तपासात सिद्ध झालेले नाही, असे एसआयटीने या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे एनसीबीला या कारवाईत आर्यन खानकडे ड्रग्ज सापडले नाही तर त्याला अटक का करण्यात आली? त्याचा फोन ताब्यात घेऊन त्याचे चॅट का तपासण्यात आले? असे अनेक प्रश्न आता निर्माण झाले असून एनसीबीचे मुंबई विभागाचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या एकूणच भूमिकेवर संशयाचे मळभ दाटले आहे.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

आर्यन खानच्या अटकेवरून त्यावेळी बराच गदारोळ झाला होता. आर्यन खानला या प्रकरणात जाणीवपूर्वक गोवण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला होता. मुंबई उच्च न्यायालयानेही आर्यन खानचा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटशी संबंध असल्याचा एनसीबीचा दावा फेटाळून लावला होता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा