एमआयएम गेल्याने वंचित बहुजन आघाडीला काहीच फरक पडणार नाहीः प्रकाश आंबेडकर

0
556
संग्रहित छायाचित्र.

अमरावतीः लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला मुस्लिम मते मिळालीच नाहीत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत एमआयएम आमच्यापासून दूर गेल्याने काहीही फरक पडणार नाही. लोकसभा निवडणुकीतील चित्र पाहून राज्यातील मुस्लिम समाज वंचित बहुजन आघाडी सोबतच आहे, अशी स्पष्टोक्ती वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.

एमआयएमने वंचित बहुजन आघाडीशी फारकत घेत विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा केल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी पहिल्यांदाच आपली भूमिका स्पष्ट केली. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे मातंग समाजाच्या वतीने आयोजित सत्ता संपादन मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी ही स्पष्टोक्ती दिली. मागच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे आपणाला स्वतःचे प्रतिनिधित्व मिळेल, अशी मुस्लिम मानसिकता होती. मागच्या निवडणुकीतील चित्र पाहून राज्यातील मुस्लिम मते वंचित बहुजन आघाडीकडे झुकली आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी मुस्लिम समाजाला 25 जागा देणार आहे, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

एमआयएमच्या निर्णयाबाबत विचारले असता प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, तसा तो एमआयएमलाही आहे. आधी आम्ही युतीत होतो, आता नाही आहोत. एमआयएम पुढची जी काही वाटचाल करेल, त्यासाठी त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

वंचित आघाडी सत्तेत येण्याच्या धास्तीने विरोधी पक्षातील नेते भाजपमध्ये

आगामी विधानसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडी सत्तेत आली तर आपण विस्थापित होऊ, अशी भीती विरोधी पक्षातील नेत्यांना आहे. त्यामुळेच ते भाजपमध्ये जात आहेत. भाजपमध्ये जाऊन वंचित बहुजन आघाडीला सत्तेपासून रोखण्याचा त्यांचा प्रयत्न चालला आहे. परंतु आम्ही किल्ला लढू आणि किल्ला सर करू, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा