मोदींच्या सहकार मंत्रालयामुळे महाराष्ट्रातील सहकार चळवळी गंडांतर येईल ही चर्चा निरर्थकः शरद पवार

0
271
संग्रहित छायाचित्र.

बारामतीः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्रात स्वतंत्र सहकार खाते निर्माण करून या खात्याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सोपवल्यामुळे महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा संपुष्टात येईल, अशी चर्चा मंत्रिमंडळ विस्तारापासूनच सुरू झालेली असली तरी ही चर्चाच निरर्थक असल्याची स्पष्टोक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. केंद्र सरकारमधील स्वतंत्र सहकार खात्यामुळे महाराष्ट्रातील सहकार चळवळीवर गंडांतर येईल, ही चर्चा निरर्थक असल्याचे पवार म्हणाले.

बारामतीतील गोविंद बाग या आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना शरद पवारांनी या मुद्यावर आपली स्पष्ट भूमिका मांडली. देशाच्या राज्यघटनेनुसार राज्यातील सहकार कायदे बनवण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. त्यानुसार महाराष्ट्राच्या विधानसभेने सहकार कायदे तयार केले आहेत. राज्याच्या विधानसभेने तयार केलेल्या कायद्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करण्याचा अधिकार केंद्र सरकारला नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या नव्या सहकार खात्यामुळे महाराष्ट्रातील सहकार चळवळीवर गंडांतर येईल, अशी जी चर्चा केली जात आहे, ती निरर्थक आहे, असे पवार म्हणाले.

 मोदी सरकारने ९७ व्या घटनादुरूस्तीनंतर प्रथमच केंद्रात स्वतंत्र सहकार खाते निर्माण केले आहे. केंद्रातील या नव्या खात्यामुळे राज्य सरकारच्या सहकार खात्यावर बंधने येतील, राज्यांचे सहकार खात्यासंबंधीचे अधिकार कमी केले जातील, असे वेगवेगळे अंदाज या खात्याच्या निर्मितीनंतर बांधले जात होते. त्यापार्श्वभूमीवर शरद पवारांनी दिलेल्या या स्पष्टीकरणामुळे या चर्चांना आता पूर्णविराम मिळणार आहे.

सहकारामधील मल्टिस्टेट बँका हा प्रकार केंद्र सरकारच्या अखत्यारित येतो. त्यामुळे केंद्रात स्वतंत्र सहकार मंत्रालय निर्माण झालेले असले तरी हा काही नवीन विषय नाही. मी दहा वर्षे केंद्रात कृषी खाते सांभाळले. त्यावेळीही हा विषय होता. तसाच को आताही आहे. त्यात नवीन काहीच नाही, असे शरद पवार म्हणाले.

 केंद्र सरकारने सहकार खाते निर्माण केल्यानंतर त्यावर माध्यमांनी चर्चा घडवून आणून वातावरण निर्माण केले. केंद्राच्या सहकार मंत्रालयामुळे राज्यातील सहकार चळवळीवर परिणाम होईल, अशी चर्चा माध्यमांनीच घडवून आणली. राज्याच्या सहकार चळवळीवर या स्वतंत्र मंत्रालयाचा काही परिणाम होईलच असे भासवण्यात आले. मात्र हे दुर्दैवी आहे, असे शरद पवार म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा