अभिनेता सुशांतसिंह राजपूतची आत्महत्याच, एम्सच्या पथकाचे शिक्कामोर्तब; भाजप तोंडघशी

0
188
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने आत्महत्याच केल्याचा अंतिम अहवाल एम्सच्या पथकाने सीबीआयला सोपवला आहे. सुशांतसिंहचा खून झाल्याचा दावा या अहवालात पूर्णतः फेटाळून लावण्यात आल्यामुळे सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येवरून राजकारण करून महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी उतावीळ झालेला भाजप चांगलाच तोंडघशी पडला आहे.

मोदी सरकारने सुशांतसिंह राजपूत आत्महत्येचा तपास परस्पर मुंबई पोलिसांकडून काढून घेऊन सीबीआयकडे सोपवल्यानंतर सुशांतच्या मृत्यूचे नेमके कारण शोधून काढण्यासाठी एम्सच्या डॉक्टरांचे एक पथक नियुक्त केले होते. या पथकाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्वातील पथकाने आपला अंतिम अहवाल सीबीआयच्या सुपूर्द केला आहे. या अहवालात सुशांतचा मृत्यू आत्महत्येमुळेच झाला असल्यावर शिक्कामोर्तब करत त्याची हत्या करण्यात आल्याचा दावा फेटाळून लावण्यात आला आहे.

डॉ. सुधीर गुप्ता यांच्या हवाल्याने इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे. एम्सच्या डॉक्टरांच्या पथकाचा हा अहवाल तज्ज्ञांचे मत म्हणून ग्राह्य धरला जाणार असून सीबीआयचे पथक आता एम्सच्या डॉक्टरांचा अहवाल आणि तपासात समोर आलेली माहिती याची पडताळणी करून पहात आहे. सुशांतसिंहने आत्महत्याच केल्याचा निर्वाळा मुंबई पोलिसांनी दिला होता. मात्र सुशांतसिंहची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करत भाजपचे काही नेते आणि बिहार सरकारने या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीने हा तपास सीबीआयकडे सोपवला होता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा