शेतकरी कर्जमाफीसाठी ना ऑनलाइन नोंदणी ना फॉर्म भरण्याची आवश्यकता!

  0
  84
  संग्रहित छायाचित्र.

  नागपूर: महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली आहे. या कर्जमाफीची प्रक्रिया अत्यंत सोपीआणि सुटसुटीत असून कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करावी लागणार नाही किंवा कोणताही फॉर्म भरून देण्याची आवश्यकता नाही. शेतकऱ्यांना ही कर्जमाफी समजणे सोयीचे जावे म्हणून एका माहितीपटाद्वारे गावागावांत जाऊन कर्जमाफीची प्रक्रिया समजून सांगितली जाईल,असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

  विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमदार, खासदार आणि सरकारी कर्मचारी वगळता सर्व शेतकऱ्यांना सरसकट ही कर्जमाफी मिळणार आहे. कर्जमाफीसाठी कोणत्याही अटी किंवा शर्ती घालण्यात आलेल्या नाहीत. कर्जमाफीचा पैसा बँकेला न देता थेट शेतकऱ्यांच्याच खात्यावर जमा केला जाणार आहे. कर्जमाफीची ही प्रक्रिया अत्यंत सोपी असेल. ही प्रक्रिया शेतकऱ्यांना समजावून सांगण्यासाठी एक माहितीपट तयार करण्यात येईल आणि गावागावांत हा माहितीपट दाखवला जाईल. येत्या मार्चपासून कर्जमाफीची ही प्रक्रिया सुरू होणार असून राज्यातील शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

   पुढील महिन्यापासून गोरगरिबांना 10 रुपयांत पोटभर जेवण:  जानेवारी महिन्यापासून राज्यात शिवभोजन योजना राबवण्यात येणार असून या योजनेअंतर्गत राज्यातील गोरगरिबांना अवघ्या दहा रुपयांत पोटभर जेवणाची थाळी देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केली. शिवसेनेच्या निवडणूक वचननाम्यात दहा रुपयांत थाळी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्याची आम्ही वचनपूर्ती करत आहोत. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर राज्यात 50 ठिकाणी ही योजना राबवण्यात येईल. ही योजना सुरु झाल्यानंतर तिच्यातील त्रुटी दूर करून या योजनेचा संपूर्ण राज्यभर विस्तार करण्यात येईल. या योजनेमुळे राज्यातील गोरगरिबांना दहा रुपयांत पोटभर जेवण मिळेलच, शिवाय अनेक हाताना रोजगारही मिळणार असल्याचे ठाकरे म्हणाले.

  प्रतिक्रिया द्या

  कृपया आपली टिप्पणी द्या!
  कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा