‘‘टिकटॉक टार’ पूजा चव्हाणच्या आत्महत्येस कुणीही जबाबदार नाही!’, संजय राठोडांवरील बालंट टळले?

0
1558
संग्रहित छायाचित्र.

पुणेः महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या आणि शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा देण्यास भाग पाडणाऱ्या बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील ‘टिकटॉक स्टार’ पूजा चव्हाण हिच्या आत्महत्याप्रकरणात आता नवीन माहिती समोर आली आहे. पूजाच्या आत्महत्येला कुणीही जबाबदार नाही आणि आमचा कुणावरही आरोप नाही, असा जवाब तिच्या आईवडिलांनी पुण्याच्या वानवाडी पोलिसांत नोंदवला आहे. पूजाच्या आईवडिलांनीच पोलिसांत दिलेल्या या जवाबामुळे माजी वनमंत्री संजय राठोड यांच्यावरील बालंट टळल्याचे मानण्यात येत आहे.

मूळची बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील असलेली पूजा चव्हाण हिचे आत्महत्या प्रकरण समोर आल्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले. एक कथित ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर आणि त्या क्लिपमध्ये शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांचा आवाज असल्याचे आरोप झाल्यानंतर भाजपने महाविकास आघाडी सरकारबरोबरच संजय राठोड यांनाही लक्ष्य केले होते. त्यांच्या राजीनाम्यासाठी सरकारवर दबाव आल्यानंतर अखेर संजय राठोड यांना वनमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

आता या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. २२ वर्षीय पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणात आमचे कोणावरही आरोप नाहीत. तिच्या मृत्यूप्रकरणात राजकारण करण्यात आले. पूजाच्या मृत्यूनंतर जे घडले तो सर्व राजकीय ड्रामा होता, असा जवाब पूजा चव्हाणच्या आईवडिलांनी वानवाडी पोलिसांत नोंदवला आहे.

टिकटॉक स्टार पूजा चव्हाणने पुण्याच्या वानवाडी परिसरातील एका इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. वानवाडी पोलिस ठाण्यात तिच्या आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढणाऱ्या या प्रकरणात आता काही दिवसांपूर्वी तिच्या आईवडिलांनी पुण्याच्या वानवाडी पोलिस ठाण्यात जवाब नोंदवला आहे. त्या जवाबात त्यांनी पूजाच्या आत्महत्येला कुणालाही जबाबदार धरले नाही, अशी माहिती पोलिस खात्यातील सूत्रांनी दिली.

संजय राठोड यांचा मंत्रिमंडळ समावेशाचा मार्ग मोकळा?: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. निष्पक्षपातीपणे या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचू नये, म्हणून आपण वनमंत्रिपदाचा राजीनामा दिला, असे राठोड यांनी सांगितले होते. काही दिवसांपूर्वीच उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी संजय राठोड यांचा मंत्रिमंडळात पुन्हा समावेश होईल, असे संकेत दिले होते. आता पूजाच्या आईवडिलांनी तिच्या आत्महत्येला कुणालाही जबाबदार धरले नसल्यामुळे संजय राठोड यांना या प्रकरणात क्लिनचीट मिळण्याची शक्यता असल्याने मंत्रिमंडळात पुन्हा समावेशाचा त्यांचा मार्ग मोकळा झाला, असे मानण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा