राज्यात नव्या कोरोनाचा एकही रुग्ण नाही, परंतु खबरदारी आवश्यकः आरोग्यमंत्री टोपे

0
35
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः ब्रिटनसह युरोपीयन देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा नव्या प्रकारचा विषाणू आढळून आला आहे. हा नवा विषाणू अतिशय घातक असून, त्याच्या संसर्गाचा वेग पूर्वीपेक्षा ७० टक्के अधिक आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घेऊन सतर्कता बाळगण्याची गरज असल्याचे मंगळवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, ब्रिटनच्या कोरोनाशी संबंधित असलेला एकही रुग्ण राज्यात नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. एमआयटी रुग्णालय व संशोधन केंद्रात मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या. याबाबत माहिती देण्यासाठी तसेच यातील रुग्णांना निरोप देण्यासाठी आरोग्यमंत्री टोपे आले होते.

एमआयटी रुग्णालयात सात रुग्णांच्या मूत्रपिंड प्रत्योरोपणाच्या अतिशय किचकट शस्त्रक्रिया करुन रुग्णांना जीवदान देण्यात आले आहे. त्यातील सहा रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. रुग्ण चंद्रशेखर तावरे यांना पत्नी जयश्री, प्रकाश जाधव यांना वडील नभू जाधव, नारायण तायडे यांना पत्नी सविता, मंगेश खोडके यांना आई शारदा यांनी किडनी दान केली. तर सागर जाधव यांचे वडील लक्ष्मण जाधव यांचा रक्तगट जुळत नव्हता. त्यामुळे डॉक्टरांनी प्लाझ्मा थेरपी करुन किडनी प्रत्यारोपण केले. तसेच अलका घुसिंगे यांना वडील हिराचंद यांनी किडनी दिल्याने त्यांचे प्राण वाचू शकले. हे सर्व कोविड संकटाच्या काळात रुग्णालयात दाखल झाले होते. दाता कोविड पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यात आले. दाता कोरोनातून मुक्त झाल्यानंतर या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या शस्त्रक्रियेवर आधारीत डॉ. सुहास बावीकर यांच्या शोध निबंधाला आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मिळाले आहे. तसेच रक्तगट जुळत नसलेल्या जाधव यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. त्यांना मंगळवारी आरोग्यमंत्री टोपे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन रुग्णालयातून निरोप देण्यात आला.

नमुने पाठवण्यास दिरंगाई केल्यास कारवाईः ब्रिटनहून आतापर्यंत शहरात सुमारे ४७ जण दाखल झाले आहेत. या रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यातील दोघे पॉझिटिव्ह आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. तर यातील काही जणांचे स्वॅब पाठविण्यात दिरंगाई करण्यात आल्याचे पत्रकारांनी आरोग्यमंत्री टोपे यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर टोपे यांनी असा प्रकार औरंगाबादेत घडला असेल तर त्याची सखोल चौकशी करुन संबंधितांना जाब विचारण्यात येईल. तसेच गरज भासल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे टोपे म्हणाले.

राज्य स्तरावर योग्य ती खबरदारीः ब्रिटनमध्ये आढळून आलेला नवीन विषाणू घातक आहे. त्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकार योग्य ती खबरदारी व उपाययोजना करत आहे. ब्रिटनहून येणारे प्रवाशांना क्वारंटाईन केले जात आहे. त्यासाठी संपुर्ण आरोग्य यंत्रणेसह प्रशासन हे मिशनमोडवर आहे. नागरिकांनी आता अधिक सतर्क राहून काळजी घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे, असे टोपे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा