राज्यपाल कोश्यारींना झटकाः अर्णब गोस्वामींच्या कुटुंबियांना तुरुंगात भेटीची परवानगी नाहीः गृहमंत्री

0
1022
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः वास्तुसजावटकार अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी तळोजा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेले रिपब्लिकन टीव्हीचे प्रमुख अर्णब गोस्वामींच्या कुटुंबियांना तुरुंगात जाऊन त्यांची भेट घेता येणार नाही, असे स्पष्टीकरण गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे. अर्णब यांच्या अटकेवरून भाजप आणि महाविकास आघाडी असे राजकारण रंगले असतानाच त्यात उडी घेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अर्णब यांच्या कुटुंबियांना तुरुंगात भेट घेऊ द्या, अशी सूचना गृहमंत्र्यांना केली होती. त्यावर देशमुखांनी हे स्पष्टीकरण देत राज्यपालांना जोरदार झटका दिला आहे.

 अर्णब गोस्वामी यांना अटक झाल्यामुळे महाराष्ट्रातील भाजप नेते कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. या अटकेविरोधात त्यांनी आंदोलनेही केली आहेत. त्यातच आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांना फोन करून अर्णब यांच्या कुटुंबियांना तुरुंगात त्यांची भेट घेण्याची आणि बोलण्याची परवानगी द्या, अशी सूचना केली होती. त्यावर अनिल देशमुख यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

 अर्णब यांच्या कुटुंबियांना तुरुंगात जाऊन भेटण्याची परवानगी द्यावी, यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी फोन केला होता. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार महिन्यांपासून सर्व तुरुंगात कैद्यांच्या नातेवाईकांना भेटण्यास मनाई आहे. संसर्गाचा धोका असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अर्णब यांच्या कुटुंबियांना तुरुंगात जाऊन भेटता येणार नाही. पण ते त्यांच्याशी फोनवर बोलू शकतात, असे देशमुख म्हणाले.

 देशमुखांनी स्पष्ट केलेल्या या भूमिकेमुळे राज्यपालांना हा जोरदार झटका असल्याचे मानण्यात येत आहे. भाजप नेत्यांची डाळ शिजत नसल्यामुळे स्वतः राज्यपालांनी या प्रकरणात एन्ट्री करूनही अर्णब यांना दिलासा मिळू शकलेला नाही. अन्य सर्वसामान्य कैद्यांप्रमाणेच तांत्रिक मुद्यावर अर्णब यांच्याही कुटुंबियांना भेटीची परवानगी नाकारण्यात आल्यामुळे आता भाजप नेते काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा