…तेव्हा तर तुम्हाला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्याः सुरक्षा कपातीवरून भाजपवर काँग्रेसचा पलटवार

0
1130
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह काही भाजप नेत्यांच्या सुरक्षेत महाविकास आघाडी सरकारने मोठी कपात केल्यामुळे आता राजकारणही तापू लागले आहे. भाजपने राज्य सरकारचा हा निर्णय सुडबुद्धीचा असल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसने या आरोपाला जोरदार प्रत्युत्तर दिले असून गांधी परिवाराला धोका असतानाही त्यांची सुरक्षा कमी करताना तुम्हाला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या, आता  धोका नसल्यामुळे सुरक्षा कमी केली तर आकांडतांडव करू लागले, असा पलटवार काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सांवत यांनी केला आहे.

महाविकास आघाडी सरकारने देवेंद्र फडणवीस यांची झेड प्लस दर्जाची सुरक्षा काढून घेऊन त्यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याही सुरक्षेत कपात करण्यात आली असून त्यांनाही वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रसाद लाड यांची सुरक्षा काढून घेतली आहे.

हेही वाचाः फडणवीस, राज ठाकरे, चंद्रकांत पाटलांच्या सुरक्षेत मोठी कपात, फडणवीसांची बुलेटप्रुफ गाडी काढली!

फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याही सुरक्षेत कपात करण्यात आली असून त्यांना वाय प्लसऐवजी एक्स दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.  सुरक्षा कपातीचा महाविकास आघाडी सरकारचा भाजपला चांगलाच झोंबला असून सरकारची ही कारवाई सुडबुद्धीची असल्याचा आणि कोत्या मनोवृत्तीची असल्याचा आरोप भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे. तर भाजप आमदार राम कदम यांनी काही बरे वाईट झाले तर याद राखा असा इशारा दिला आहे.

भाजप नेत्यांच्या आरोपांना काँग्रेसने जोरदार प्रत्युत्तर देत पलटवार केला आहे.  भाजप नेत्यांना धोका नसल्यामुळे सुरक्षा कमी झाली तर आकांडतांडव, आक्रोश, आकांत, विलाप, बोंब इत्यादी भावना उचंबळू लागल्या आहेत. परंतु गांधी परिवाराला धोका असतानाही त्यांची व डॉ. मनमोहनसिंगांची सुरक्षा, स्टाफ कमी करताना आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. मोदीजींची सूड भावना असते, महाविकास आघाडी सरकारची नाही, असे ट्विट काँग्रेस प्रवक्ते सचिन सांवत यांनी केले आहे.

हेही वाचाः भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुनगंटीवार बिनसुरक्षेचे, राज्य सरकारने काढली विशेष सुरक्षा

चंद्रकांत पाटलांची अवस्था डोनाल्ड ट्रम्पसारखीः भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची अवस्था डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखी झाली आहे. त्यांना पराभवाची कारणमीमांसा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या समोर करताना नाकी नऊ आले असतील, अशी खोचक टीकाही सचिन सावंत यांनी कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना केली आहे. ज्या ठिकाणी बॅलेटवर निवडणुका झाल्या आहेत, तेथे भाजपचा पराभव झाला आहे. त्यामुळे भाजपचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे, असेही सावंत यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा