१६ शहरातील वीज वितरण, तिन्ही वीज कंपन्यांचे खासगीकरण?; प्रधान सचिवांनी दिले ‘हे’ स्पष्टीकरण

0
152
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबाद: राज्यातील १६ शहरांतील वीज वितरणाच्या खासगीकरणासह महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या कंपन्यांचे खासगीकरण करण्याचा कोणताही प्रस्ताव राज्य शासनाच्या विचाराधीन नाही. याबाबत सुरू असलेल्या कोणत्याही चर्चेत तथ्य नाही. त्यामुळे वीज कामगार, कर्मचारी संघटनांनी घोषित केलेला २८ व २९ मार्चचा संप मागे घ्यावा, असे आवाहन राज्याच्या ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी केले.

केंद्र सरकारच्या विद्युत संशोधन बिल-२०२१ च्या मसुद्यात काही सुधारणा करण्याबाबत राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंग यांच्याकडे महाराष्ट्र शासनाची भूमिका विषद करून दिली असल्याचेही वाघमारे यांनी संघटना पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता संघर्ष समितीच्या २६ व महाराष्ट्र राज्य वीज कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीतील १२ संघटनांनी वीज कंपन्यांच्या खासगीकरणा विरोधात व विविध मागण्यांसाठी २८ व २९ मार्च रोजी संप करण्याचा इशारा दिला आहे.

या पार्श्वभूमीवर शुक्रवारी या सर्व संघटनांच्या प्रतिनिधींशी प्रधान सचिव (ऊर्जा) तथा महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. या बैठकीला महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांच्यासह तिन्ही वीज कंपन्यांचे संचालक (मानव संसाधन) उपस्थित होते.

चला उद्योजक बनाः  स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

वाघमारे यांनी तिन्ही वीज कंपन्यांच्या खासगीकरणाच्या सर्व शक्यता फेटाळून लावल्या. तसेच १६ शहरांतील वीज वितरणाच्या खासगीकरणाच्या माध्यमांतील चर्चेत काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. राज्य शासनाचाही तसा कोणताही प्रस्ताव नाही. केंद्र सरकारच्या विद्युत सुधारणा अधिनियमासही राज्य शासनाने विरोध केलेला असल्याचे त्यांनी सांगितले.

संघटनांच्या विविध मागण्यांबाबत विशेषत: रिक्त जागा युध्दपातळीवर भरणे व कंत्राटी कामगारांचे प्रश्न कायदेशीर सल्ला घेऊन सकारात्मकपणे मार्गी लावण्यात येतील. त्यामुळे सर्व संघटनांनी घोषित केलेला २८ व २९ मार्च रोजीचा संप मागे घेऊन शासनास सहकार्य करावे, असे आवाहन वाघमारे यांनी केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा