औरंगाबादेत एनएसजी कमांडोची पोलिसांना फायटरने मारहाण, मास्कबाबत विचारताच हल्ला

0
374

औरंगाबादः औरंगाबादेतील नगर नाक्यावर नाकाबंदी दरम्यान एनएसजी कमांडोने पोलिसांना फायटरने मारहाण केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. विनामास्क जात असलेल्या एनएसजी कमांडोला थांबवून चौकशी केल्यामुळे त्याने नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांना शिविगाळ करत फायटरने मारहाण केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

बुधवारी छावणी पोलिस पोलिस ठाण्याचे कर्मचारी नगर नाक्यावर नाकाबंदी करत होते. या ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई सुरू होती. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास एका चारचाकी वाहनातून एक युवक विनामास्क जात असल्याचे दिसल्यामुळे पोलिसांनी त्याला थांबवून चौकशी केली. तेव्हा या तरूणाने पोलिसांना शिविगाळ करत मारहाण केली. या झटापटीत सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग भागिले यांच्या नाकाला आणि तोंडाला मार लागून ते जखमी झाले. तर जमादार टाक यांच्या अंगावरील कपडे फाडले गेले.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त मीना मकवाना, निकेश खाटमोडे, छावणी विभागाचे सहायक पोलिस आयुक्त विवेक सराफ, छावणीचे पोलिस निरीक्षक मनोज पगारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी त्या युवकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या विरोधात छावणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना मारहाण करून जखमी करणाऱ्या ३४ वर्षीय युवकाचे नाव गणेश गोपीनाथ भुमे (रा. दिल्ली, हल्ली मुक्कामः फुलंब्री) असून तो दिल्लीत एनएसजी सेंट्रल आर्म पोलिस फोर्समध्ये कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. ज्या गाडातून गणेश प्रवास करत होता, त्या गाडीवरही एनएसजी कमांडो असे लिहिलेले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा