ओबीसींना वैद्यकीय प्रवेशासाठी राष्ट्रीय कोट्यात दिले २७ टक्क्यांऐवजी फक्त ३.८ टक्केच आरक्षण!

0
144
प्रतिकात्मक छायाचित्र.

मुंबईः वैद्यकीय शिक्षणासाठी राष्ट्रीय कोट्यामध्ये ओबीसींना नियमानुसार २७ टक्के आरक्षण मिळणे आवश्यक असूनही केंद्रीय वैद्यकीय प्रवेश समितीने देशभरातील १७७ वैद्यकीय महाविद्यालयांतील केंद्राच्या राखीव जागांमधील १५ टक्के केंद्रीय कोट्यातून केवळ ३.८ टक्केच आरक्षण ओबीसींना दिले आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून न डावलता त्यांना राष्ट्रीय कोट्यातील वैद्यकीय प्रवेशासाठी हक्काचे २७ टक्के आरक्षण द्या, अशी मागणी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन आणि सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत यांच्याकडे केली आहे.

सरकारने मागासवर्गीय आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे आरक्षण बेकायदेशीररित्या कमी केले तर ते उच्च शिक्षणापासून वंचित राहणार आहेत. देशभरातील वैद्यकीय प्रवेशासाठी ६६ हजार ३३३ जागांमधून केंद्रीय कोट्यातील १५ टक्केप्रमाणे ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणानुसार २ हजार ५७८ जागा आरक्षित असायला हव्यात. परंतु केवळ ३७१ जागा ओबीसींना नावापुरत्या आरक्षित करून देण्यात आल्या आहेत. ही टक्केवारी केवळ ३.८ टक्के एवढी आहे, असे भुजबळ यांनी म्हटले आहे. ओबीसी विद्यार्थ्यांना त्यांचे हक्काचे २७ टक्के आरक्षण देवून महाराष्ट्रासह देशातील केंद्र सरकारच्या वैद्यकीय शिक्षणाच्या २ हजार ५७८ जागांवर त्यांना प्रवेश देण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी अशी आग्रही मागणी भुजबळांनी केली आहे.

केंद्रीय कोट्यात ७३,७ टक्के जागा अनारक्षितः वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या केंद्रीय कोट्यात ओबीसींनी ३७१ जागा (३.८ टक्के) एससीला १ हजार ३८५ जागा (१५ टक्के) व  एसटीला ६६९ जागा (७.५ टक्के) त्यांच्या आरक्षणानुसार आरक्षित ठेवलेल्या आहेत. खुल्या गटातील विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय कोट्यातून ७ हजार १२५ जागा ठेवण्यात आल्या आहेत. अनारक्षित जागांची  टक्केवारी ७३.७ टक्के एवढी असल्याचे भुजबळांनी निदर्शनास आणून दिले आहे.

ओबीसींच्या २ हजार २०७ जागा खुल्या प्रवर्गालाः  मंडल आयोग व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ओबीसीला २७ टक्के, एससीला १५ टक्के व एसटीला ७.५ टक्के असे घटनात्मक आरक्षण आहे. परंतु आरक्षणाचे सर्वनिकष, सूचना आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांना डावलून  केंद्रीय मंडळाने वैद्यकीय शिक्षणासाठी फक्त ३७१ जागा ओबीसींसाठी आरक्षित ठेवल्या आहेत. ओबीसींच्या वाट्याच्या २ हजार २०७ जागांसह एकूण ७ हजार १२५ जागा खुल्या प्रवर्गासाठी सोडण्यात आलेल्या आहेत. हा ओबीसी विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय असल्याचे भुजबळांचे म्हणणे आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा