…तर ओबीसी समाज मुस्लीम धर्म स्वीकारणार का?: प्रकाश आंबेडकरांचा थेट सवाल

0
496
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः ओबीसी समाज हा सध्या धर्म आणि अधिकार या दुहेरी पेचात सापडला आहे. मी ओबीसींना सरळ विचारतो की, तुम्ही धर्मांतर करणार आहात का? मुस्लीम धर्म स्वीकारणार आहात का? या प्रश्नाचे उत्तर जवळपास नकारार्थी आहे. मग ओबीसी समाजाने धर्मांध पक्षांची कास सोडली पाहिजे. ज्या पक्षांना ते आपले मानत आहेत, त्या पक्षांना सोडून स्वतःचा राजकीय पक्ष निर्माण करावा लागेल. त्यांनी स्वतंत्रपणे वाटचाल सुरू केली पाहिजे, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

मुंबईत पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षण, मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांबाबत भाष्य केले. गेल्या काही वर्षांत देशातील ओबीसी समाजाचे जे आर्थिक उत्थान झाले आहे, त्यांना सरकारमध्ये जे काही प्रतिनिधीत्व मिलाले आहे, ते आगामी काळात टिकवायचे असेल तर या समाजाने स्वतःची भूमिका घ्यायला शिकले पाहिजे. धर्मांध पक्षांची कास सोडून स्वतंत्रपणे वाटचाल सुरू केली पाहिजे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

चला उद्योजक बनाः  एनएलएम योजनेत कुक्कुट, शेळी, मेंढी, वराह पालनासाठी असे घ्या अर्थसहाय्य

ओबीसींच्या जागा वगळता निवडणुका होऊ नयेत. एकतर सर्व जागांवर निवडणुका घ्या किंवा ओबीसींसह सर्वच जागांवरील निवडणुका पुढे ढकला, अशी भूमिका राज्य सरकारने न्यायालयात मांडली आहे. न्यायालयानेही निवडणुका पुढे ढकलण्यास संमती देऊ नये. ते घटनेच्या विरोधात आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर त्यामद्ये हस्तक्षेप करणार नाही, अशी सर्वोच्च न्यायालयाची भूमिका असते. तीच भूमिका न्यायालयाने स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकींच्या बाबतही घ्यावी. उद्या देशात युद्ध झाले किंवा आणीबाणी लागू झाली तरी निवडणुका पुढे ढकलता कामा नये. पालिका बरखास्त होण्यापूर्वी त्या ठिकाणी नवीन सभागृह तयार झाले पाहिजे. कारण एकदा निवडून आलेल्या सरकारला फक्त पाच वर्षे सत्तेत राहण्याचा जनादेश असतो. त्यामुळे कोणत्याही कारणांनी निवडणुका पुढे ढकलणे योग्य नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रीय जनता दल आणि मुस्लीम लीग एकत्र लढणार असल्याची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केली. जानेवारी महिन्यात आम्ही जागा वाटप करू. प्रचाराला सुरूवात करू. आगामी काळात आणखी काही संघटना या युतीमध्ये सहभागी होऊ शकतात, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

शिवसेनेसोबत युती करू, पण एमआयएमसोबत नाहीः महानगरपालिका निवडणुकीत आम्ही एमआयएमसोबत युती करणार नाही. आम्ही शिवसेनेसोबत युती करायला तयार आहोत. परंतु ते आमच्यासोबत येतील का, हा प्रश्न आहे. आम्ही धर्मनिरपेक्ष पक्षासोबत युती करायला तयार आहोत. आम्ही शिवसेनेसोबतही युती करायला तयार आहोत,असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

काँग्रेसशीही युतीस तयारः आम्ही मुंबईच्या पातळीवर एक पर्याय उभा करत आहोत. काँग्रेससोबत युती करायला आम्ही तयार आहोत. तुम्ही ज्या जागा हरलेल्या आहेत, त्या आम्हाला द्या, अशी मागणी आम्ही त्यांच्याकडे सतत केली आहे. हरलेल्या जागा हे जिंकतात, त्यामुळे आपले पुढे जाऊन काय होणार ही भीती काँग्रेसच्या मनात आहे. त्यामुळे ते युती करायला घाबरत आहेत. म्हणूनच आम्हाला काँग्रेसने भाजपची बी टीम म्हटले आहे. आम्ही काँग्रेसशी युती करायला तयार आहोत, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा