महात्मा गांधींचा खून नव्हे, अपघाती मृत्यूः ओडिशा सरकारच्या पुस्तिकेत खोडसाळपणा

नवी दिल्ली येथील बिर्ला हाऊसमध्ये 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधी यांची अपघाती कारणांमुळे मृत्यू झाला, असा उल्लेख ओडिशा सरकारने प्रकाशित केलेल्या पुस्तिकेत करण्यात आला आहे.

0
129
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः देशात एकीकडे महात्मा गांधींचा खुनी नथुराम गोडसेचे उदात्तीकरण केले जात असतानाच ओडिशा सरकारने प्रकाशित केलेल्या पुस्तिकेत महात्मा गांधींचा अपघातील मृत्यू झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. महात्मा गांधींवर गोळ्या झाडून नथुराम गोडसेने त्यांची हत्या केली होती. मात्र, ओडिशा सरकारच्या  पुस्तिकेतील या उल्लेखामुळे देशभर संताप उफाळून आला आहे.

महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त ओडिशा सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने प्रकाशित केलेल्या ‘आमा बापूजीः एका झलका’ (आमचे बापूजी : एक झलक) या दोन पानी पुस्तिकेत नवी दिल्ली येथील बिर्ला हाऊसमध्ये 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधी यांची अपघाती कारणांमुळे मृत्यू झाला, असा उल्लेख करण्यात आला आहे. या पुस्तिकेत महात्मा गांधींनी दिलेली शिकवण, त्यांचे कार्य आणि ओडिशाशी असलेला त्यांचा संबंध अशी सर्व माहिती दिली आहे. मात्र मृत्यूबाबतच्या खोडसाळ उल्लेखामुळे वादंग उठले आहे. युवा पिढीला चुकीची माहिती देण्यासाठी इतिहासाची मोडतोड करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप करत विरोधी पक्षांचे नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी तत्काळ माफी मागावी आणि ही पुस्तिका लगेच मागे घ्यावी, अशी मागणी केली आहे.

 हा सगळा वाद उफाळून आल्यानंतर या पुस्तिकेत कुणी तरी जाणीवपूर्वक बदल केल्याचा आरोप ओडिशाचे शालेय शिक्षण मंत्री समीर दास यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि कारवाईचे आदेश दिले जातील, असेही ते म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा