मुंबईत न्यू इयर सेलिब्रेशनवर पूर्णतः बंदी, दोन दिवसांत स्पष्ट होणार अन्य जिल्ह्यांतील चित्र

0
72
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबईः देशात ओमीक्रॉन विषाणूचा वाढत चाललेला धोका लक्षात घेता राज्य सरकारने शुक्रवारी नव्याने निर्बंध लागू केल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने शुक्रवारी रात्री उशिरा मोठा निर्णय घेत मुंबईत न्यू ईयर सेलिब्रेशनवर पूर्णपणे बंदी घातली आहे. राज्याच्या उर्वरित जिल्ह्यांत नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनवर कोणते आणि कसे निर्बंध राहणार? याबाबतचे चित्र येत्या दोन दिवसांत स्पष्ट होणार आहे.

ओमीक्रॉनचे सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. त्यामुळे चिंता वाढल्यामुळे राज्य सरकारने कठोर पावले उचलत शुक्रवारी नव्याने निर्बंध लागू केले. त्याबाबतच्या गाईड लाइन्सही जारी केल्या आहेत. त्यानुसार राज्यात रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. जमावबंदीच्या काळात पाचपेक्षा जास्त लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येता येणार नाही किंवा एकत्र बाहेर पडता येणार नाही.

चला उद्योजक बनाः शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून कर्ज/सबसिडी मिळवायची?, पण कशी? वाचा सविस्तर

नव्या निर्बंधानुसार विवाह सोहळे, धार्मिक, सामाजिक, राजकीय कार्यक्रमांतील उपस्थितीवरही नियंत्रण आणण्यात आले आहे. उपाहारगृहे, चित्रपट, नाट्यगृहे, व्यायामशाळांमध्ये ५० टक्के उपस्थितीचे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. नववर्ष समारंभात गर्दी होऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.

राज्य सरकारने हे निर्बंध जाहीर केल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने शुक्रवारी रात्री उशिरा मोठा निर्णय घेत मुंबईत न्यू ईयर सेलिब्रेशनवर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुंबई महानगरपालिका क्षेत्रात बंदिस्त किंवा मोकळ्या जागेत कोणताही कार्यक्रम, समारंभ, पार्टी, संमेलन आयोजित करण्यास पूर्णतः मनाई करण्यात आली आहे. हा आदेश आज मध्यरात्रीपासूनच लागू होणार आहे.

हेही वाचाः थर्टी फर्स्ट घरातच कराः आजपासूनच नवीन नियम लागू, रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदी लागू

राज्य सरकारने जारी केलेल्या गाईड लाइन्सच्या धर्तीवर राज्यातील सर्व महापालिकांचे आयुक्त आणि जिल्हाधिकारी स्थानिक परिस्थितीनुसार गाईड लाइन्स जारी करत असतात. येत्या दोन दिवसांत त्या जारी केल्या जातील. तेव्हा मुंबईप्रमाणेच राज्यातील इतर जिल्ह्यातही जमावबंदीचा कालावधी वगळता न्यू ईयर सेलिब्रेशनच्या समारंभांना परवानगी मिळणार की नाही? याबाबतचे चित्र स्पष्ट होईल.

 राज्य सरकारने रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदी आदेश लागू केलेला असल्यामुळे या काळात कोणत्याही जिल्ह्यात न्यू इयर सेलिब्रेशनसाठी पार्टी, समारंभ, कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी मिळणार नाही. जमावबंदीचा कालावधी वगळता उर्वरित कालावधी पार्ट्या आयोजित करण्यास परवानगी दिली जाण्याची शक्यताही कमीच आहे. त्यामुळे यंदाचा थर्टी फर्स्ट घरातच आणि कुटंबातच साजरा करावा लागण्याची शक्यता अधिक आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा